Nagpur Heatwave Update: नागपूर : उपराजधानीत एप्रिल अखेरपासून उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा ४५ अंशांच्या जवळ पोहोचल्याने उकाड्यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यातच नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत उन्हाशी संबंधित आजारांचे केवळ ५८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णांना उष्माघात नसून शहरात एकही संशयित मृत्यूची नोंद नसल्याचा नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.
नागपुरात रोज उकाडा वाढत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपूर महापालिकेच्या दवाखान्यातही स्थिती सारखी आहे. डोके गरगरणे, अशक्तपणा, उलट्या आणि निर्जलीकरण अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त आहेत. त्यानंतरही महापालिकेच्या नोंदीत उन्हाशी संबंधित रुग्णांची संख्या इतकी कमी कशी, असा सवाल आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शहरात काही ठिकाणी सार्वजनिक सावलीचा अभाव, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि उष्णतेपासून बचावासाठी मर्यादित सुविधा असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, फेरीवाले आणि वाहतूक कर्मचाऱ्यांना बसत आहे. महापालिकेकडून मात्र सर्वत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य केंद्रांमध्ये विशेष कक्ष आणि दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असल्याचा दावा होत आहे.
तापमान आणखी वाढण्यासचा इशारा…
हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात तापमानवाढीमुळे बेघर नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचेही समोर येत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही महापालिकेकडे एकही उष्माघाताचे रुग्ण सोडा संशयित मृत्यूची नोंद नसल्याने या मृत्यूंचे नेमके कारण काय, हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात चर्चिला जात आहे.
महापालिकेचे म्हणणे काय?
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरात एकूण ५८ रुग्णांपैकी १४ रुग्णांना उन्हामुळे स्नायूंना त्रास, २२ रुग्णांना अंगावर पुरळ (धापोड्या), १७ रुग्णांना भोवळ येणे, तर ५ रुग्णांना भोवळ येऊन बेशुद्ध पडण्याची तक्रार होती. मात्र, उष्माघात ठरवण्यासाठी रुग्णाला तीव्र तापासह रुग्णालयात दाखल करण्याइतकी गंभीर लक्षणे असतात. त्यामुळे नोंदवलेले सर्व रुग्ण उष्माघाताचे नसून किरकोळ उन्हाच्या त्रासामुळे बाधित झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या अहवालाला महापालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
