नागपूर : सातबारा उताऱ्यावर आपल्या जमिनीच्या मालकीच्या रकान्यात अचानक सरकारचे नाव दिसले, तर संबंधित जमीन सरकारच्या मालकीची झाली का, असा प्रश्न अनेक जमीनमालकांना पडू शकतो. मात्र, केवळ सातबारा उताऱ्यावर सरकारचे नाव नोंदवले म्हणून जमिनीचा प्रत्यक्ष ताबा सरकारकडे गेला, असे मानता येत नाही. महसुली नोंदी आणि जमिनीचा प्रत्यक्ष ताबा या दोन वेगळ्या बाबी आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. नागपूर जिल्ह्यातील बिना येथील जमिनीच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला.

सातबारावर सरकारचे नाव, पण ताबा कुणाचा?

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील बिना येथील सर्वे क्रमांक ७३ मधील ३३ हजार ८९२.९०३ चौरस मीटर जमीन नाथू महादेव खोडे यांच्या मालकीची होती. नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत (यूएलसी) ही जमीन अतिरिक्त घोषित करण्यात आली होती. मात्र, सरकारने प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेतला नसल्याचा दावा खोडे यांच्या वारसांनी उच्च न्यायालयात केला. दरम्यान, सातबारा उताऱ्यावर सरकारचे नाव नोंदवण्यात आले होते.

सरकारला ताबा घेतल्याचा पुरावा देता आला नाही

जमिनीचा ताबा सरकारकडे देण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली नव्हती. तसेच, प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीखही संबंधित कागदपत्रांमध्ये नमूद नव्हती, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, राज्य सरकारनेही नोटीस बजावल्याचा पुरावा सादर केला नाही. उलट, स्थळपाहणी पंचनामा आणि तपासणी अहवालातून जमिनीचा ताबा खोडे यांच्या वारसांकडे असल्याचे स्पष्ट झाले.

सातबारा उतारा म्हणजे मालकी किंवा ताब्याचा पुरावा नाही!

न्यायालयाने स्पष्ट केले की, सातबारा उताऱ्यावरील महसुली नोंदी या प्रामुख्याने महसुली उद्देशासाठी असतात. केवळ अशा नोंदीमुळे जमिनीचा मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा जमीन सरकारच्या ताब्यात गेल्याचे सिद्ध होत नाही. नागरी कमाल जमीन धारणा कायदा रद्द होण्यापूर्वी सरकारने जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला नसेल, तर संबंधित कायद्यांतर्गत सुरू असलेली कार्यवाही संपुष्टात येते, असेही न्यायालयाने नमूद केले.

जमीनमालकांनी काय लक्षात ठेवावे?

या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर सरकारचे नाव असलेल्या प्रत्येक जमिनीचा ताबा मूळ मालकाकडेच राहतो, असा सरसकट निष्कर्ष काढता येणार नाही. संबंधित प्रकरणातील कायदेशीर तरतुदी, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आणि उपलब्ध कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. मात्र, केवळ सातबारावरील नोंद पाहून जमीन सरकारच्या ताब्यात गेली असे समजण्याचे कारण नाही, हा या निर्णयाचा महत्त्वाचा संदेश आहे.