नागपूर : शहरातील उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या हिलटॉपचा परिसर बुधवारी धक्कादायक घटनेने हळहळला.
अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आले. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे जीव गुदमरल्याने ही चिमुकली मृतावस्थेत आढळली.
संतापजनक बाब म्हणजे चिमुकलीच्या अंगावर एक सुद्धा कपडा नव्हता. माणूसकीच्या नात्याला काळीमा फासत उलट्या काळजाच्या मातेने नऊ महिने पोटात जपलेल्या जीवाला कचऱ्याच्या हवाली केले.
हिलटॉप परिसरातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाला लागून गोदावरी अपार्टमेंटच्या बाहेर ही मुलगी कचऱ्यात सापडली. माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात तिला येथे कोणीतरी आणून टाकले असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पंचनामा करत चिमुकलीचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. अंबाझरी पोलिसांनी घटनेची नोंद घेत गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात झालेल्या बाळंतपणाचा शोध सुरू केला आहे. अनैतिक संबंधांमधून या चिमुकलीचा जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
रस्त्यावरून जात असताना कोणालातही चिमुकलीचा मृतदेह दिसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

