नागपूर : बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून अशाच आणखी तीन घटनांमुळे गंभीर जखमी झालेल्या चौघांना उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोहिमांमुळे रात्री रस्ता अपघात मृत्यू संख्या कमी झाल्याचा दावा करणारी वाहतूक शाखा दिवसा होणाऱ्या मृत्यूला आवर घालण्यात अपयशी ठरली आहे. प्राणांतिक अपघाताची एक घटना पारडी पोलीस हद्दीत तर दुसरी हिंगणातील गुमगाव येथे घडली. तिसरी घटना वाठोडा पोलीस हद्दीतील दिघोरी टोलनाक्यावर घडली.
दुचाकीस्वाराला कंटेनरने चिरडले
पारडी पोलीस हद्दीत नागपूर- हैदराबाद महामार्गावर दुचाकीत इंधन भरून घराकडे निघालेल्या टिव्हिएस स्कूटीला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक देत पळ काढला. महादेव दामोधर पिंपळघरे (५१) रा. गुलशननगर असे कंटेनरखाली चिरडल्या गेलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. महादेव हे पेट्रोलपंपावरून गाडीत इंधन भरून घरी जात होते. मयोत उपचारादरम्यान महादेव यांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हिंगणा आणि वाठोडा हद्दीत दोन घटना
हिंगणा पोलीस हद्दीतील घरातून एमआयडीसीत कामाला निघालेल्या दोघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. रामेश्वर हेमराज लोणगाडगे (३७) रा. रुख्मिणीनगर, हुडकेश्वर, सुरज रमेश राऊत (३२), रा. संजयगांधी नगर आणि नंदकिशोर साठे (४२) रा. पांजरा, जिल्हा वर्धा अशी दोन वेगवेगळ्या अपघातात मरण पावलेल्या पिडीतांची नावे आहेत.
चारचाकीने दोघांना चिरडले
बुटीबोरी एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करणारे रामेश्वर लोणगाडगे हे सोमवारी सायंकाळी मित्र पुनित परमानंद रामटेके (३७) आणि सुरज राऊत हे तिघे दुचाकीने हिंगणा परिसरातील गुमगाव जवळच्या सिद्धीविनायक शाळेकडून जात होते. महामार्गावर गतीरोधक असल्याने दुचाकीचालक पुनित रामटेकेने वाहनाचा वेग कमी केला. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने लोणगाडगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले रामेश्वर आणि सुजर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी एम्समध्ये नेले असता तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
टिप्परने उडवला टोलनाका
प्राणांतिक अपघाताची थरारक घटना वाठोडा पोलीस हद्दीतील दिघोरी उड्डाणपुलाजवळच्या टोलनाक्यावर घडली. भरधाव वेगात आलेल्या टिप्पने टोल नाक्यावरील अख्खा बुथ चिरडून टाकला. या टोलनाक्यावरच्या बूथमध्ये विशाल आपकाजे (२५) हे संगणक ऑपरेटर आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ते ड्युटीवर असताना नंदकिशोर साठे हे रात्रपाळीची ड्यूटी संपवून केबिनमधल्याच बाकावर झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास भरधाव टिप्परने हे केबीन उडवून लावत पळ काढला. यात जखमी साठे यांना मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
