नागपूर : नागपुरातील लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह  येथील डॉक्टरांनी एका २२ वर्षीय तरुणीची वैद्यकीय तपासणी केली. तिच्या  पोटात १४ किलोचा ट्युमर आढळला. हे बघून डॉक्टर थक्क झाले. त्यानंतर डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर काय झाले, याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील एका २२ वर्षीय मुलीला पोटात प्रचंड त्रास होत होता. विविध डॉक्टरांकडून उपचार घेतल्यावर ती लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड येथे गेली. विविध तपासणीत तिला अंडाशयाच्या मोठ्या ट्यूमरने ग्रासल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे तिच्या पोटात वेदना होत होत्या. रुग्ण गेल्या तीन महिन्यातील वाढत्या पोटदुखीची तक्रार घेऊन एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात आली.  भरती झाल्यानंतर रुग्णाचे अल्ट्रासोनोग्राफी आणि एमआरआय तपासणीसह सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून असे  दिसून आले की, जवळजवळ संपूर्ण पोटाच्या पोकळीत एक मोठा अंडाशयाचा (ओव्हेरियन) ट्यूमर होता जो आजूबाजूच्या अवयवांना दाबत होता. निष्कर्ष लक्षात घेता, स्टेजिंग लॅपरोटॉमीची योजना आखण्यात आली.

नुकतीच प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या अनुभवी तज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या प्रक्रियेदरम्यान, सुमारे १४ किलोग्रॅम वजनाचा उजव्या अंडाशयाचा एक मोठा गोळा पूर्णपणे काढून टाकण्यात आला.

ट्यूमरच्या फ्रोझन सेक्शन विश्लेषणातून बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर असल्याचे दिसून आले. बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर कमी किंवा अनिश्चित घातक क्षमतेचे ट्यूमर असतात आणि तरुण वयात दुर्मिळ असतात. परंतु नंतरच्या वयात त्यांची लक्षणे पुन्हा दिसून येऊ शकतात. रुग्णाचे तरुण वय लक्षात घेता, सर्जिकल टीमने तिच्या भविष्यातील प्रजनन क्षमता जपून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धत निवडली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तिच्या त्रासापासून लक्षणीय आराम मिळाला आणि ती बरी झाली. तिला स्थिर प्रकृतीत रुग्णालयातून सुट्टी दिली गेली.

व्हीएसपीएमएएचइ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आशिषराव देशमुख (आमदार), अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधीष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ नितीन देवस्थळे यांनी वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले. सर्जिकल टीममध्ये विभाग प्रमुख डॉ. अनुजा भालेराव, डॉ. सविता सोमलवार डॉ. कांचन द्विडमुठे, डॉ. प्रवीण करवाडे, डॉ. कांचन दाढे आणि डॉ. अभिषेक सोनकुसरे यांचा समावेश होता.