नागपूर : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम नागपुरातील हाॅटेल, रेस्ट्राॅरेंट व्यवसायिकांवर होतांना दिसत आहे. शहरातील सुप्रसिद्ध संतोष पकोडेवाला यांनी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडाच्या चुलीवर पकोडे तयार करणे सुरू केले आहे. बजाजनगर येथील ‘फॉर्महाऊस किचन’ या रेस्टॉरंट ने सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी लाकडी चुलीवरचा जेवण तयार करण्याची पर्यायी योजना आखली आहे.
त्यासाठी आवश्यक तयारीही झाली आहे. नागपूरमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने काही हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. नागपूरमधील प्रसिद्ध संतोष पकोडेवाला या हॉटेल मध्ये आज सकाळपासून अनेक खाद्यपदार्थ लाकडी चूल वर तयार करायला सुरुवात करावी लागली आहे. कालपर्यंत पाच व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत होते.
मात्र आज केवळ दोनच सिलेंडर मिळाल्याने संतोष पकोडे वाला हॉटेलमध्ये चूल पेटवून पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. दरम्यान गॅसच्या तुलनेत चुलीवरील जेवण तयार करताना अनेक अडचणी ही आहे. गॅसच्या तुलनेत लाकडी चुलीवर स्वंयपाक करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना जास्त वेळ लागेल.
२५ टक्के वंजन लाकडी चुलीवर…
नागपूरच्या फॉर्महाऊस किचन या रेस्टॉरंट ने सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी लाकडी चुलीवरचा जेवण तयार करण्याची पर्यायी योजना आखली आहे. त्या अनुषंगाने लाकडांची खरेदी करून साठा करणे ही सुरू केले आहे. सावजी जेवणासाठी ओळखल्या जाणाऱ्या फार्महाऊस किचन रेस्टॉरंट मध्ये सध्या ही २५ टक्के मेनू (चिकन मटण आणि इतर नॉनव्हेज पदार्थ) लाकडी चुलीवर तयार केले जाते. जर येणाऱ्या तीन चार दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही, तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका रेस्टॉरंट चालकांनी स्वीकारली आहे.
लाकडाचा साठा करणे सुरू
सर्व पदार्थ लाकडी चुलीवर बनवणे शक्य नाही. काही पदार्थांसाठी गॅसची हळुवार उष्णता (फ्लेम) आवश्यक असताना ते पदार्थ मेनू कार्ड मधून वगळण्याचीही काही व्यवसायिकांची तयारी आहे. आणखी एक समस्या म्हणजे चुलीवरील स्वयंपाक करताना धूर पसरेल. मात्र, ओपन गार्डन रेस्टॉरंट असल्यास धुराची तेवढी समस्या होणार नाही. नागपुरात अनेक ओपन गार्डन रेस्टॉरंट्स ने लाकडी चुलीवर स्वयंपाकाची तयारी सुरू केली. त्यासाठी लाकडाचा साठा करणे ही सुरू केल्याची माहिती आहे.
हाॅटेल व्यवसायिकांचे म्हणने काय ?
ग्राहकांना विविध व्यंजन तयार करून त्यांचे पोट भरण्याचे काम संतोष पकोडेवाला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. गॅसच्या तुटवड्यामुळे आम्ही लाकडावरच्या चुलीवर पकोडेसह इतर व्यंजन तयार करून ग्राहकांना देत आहोत, अशी माहिती संतोष पकोडेवाला प्रतिष्ठानचे संचालक संतोष फुंडे यांनी दिली.
