नागपूर: HSC paper leak: नागपूरातील शिक्षण विभाग कायम चर्चेत आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर आता पेपरफुटीच्या प्रकरणाने नागपूर राज्यात चर्चेला आले आहे. प्रचंड मोठी यंत्रणा असतानाही बारावी बोर्डाचे पेपर फुटल्याने आता हे पेपर पुन्हा घेतले जाणार का?, याचा निकालावर काय परिणाम होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली असून विद्यार्थी, पालक आणि शाळांसाठीही ही माहिती फार महत्त्वाची ठरणार आहे. 

१६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ तारखेला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी डिलिट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला असता २१ फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपरही प्रसारित झाल्याचे डिजिटल पुरावे समोर आले. विशेष म्हणजे, सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आधीच उघड झाले होते.

आता गणिताचा पेपरही त्याच साखळीतून बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून याला अटक करण्यात आली आहे. तसेच एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला पाचवा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक कार्यरत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात पोहोचल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली आहे.

 २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निदर्शनास आले. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजीच्या पेपरसंदर्भात ही बाब घडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट परीक्षा केंद्रांवर पाठवली जात असताना लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका कशा गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांमार्फत बोर्ड अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून, बोर्डाने तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परफुटी प्रकरणात चार जणांना अटक झाली असून काही महाविद्यालयांशी टायअप असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार आणि डिजिटल माध्यमातून पेपर प्रसारित होण्याच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, याचा परीक्षेवर कुठलाही परिणाम होणार नाही. राज्यात सर्वत्र सुरळीत परीक्षा झाल्याने पुन्हा पेपर घेतले जाणार नाही. तसेच निकालावर याचा काहीसा परिणाम होऊ शकतो. दरवर्षीपेक्षा काही दिवस निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.