नागपूर : हुडकेश्वर येथील शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचारानंतर खुन करण्याचा कट रचत, आरोपीने ठाणे येथून तीन चाकू, सर्जिकल साहित्यातली ब्लेड आणि कात्री सोबत आणल्याचे पोलिसांच्या तपासासून स्पष्ट झाले आहे. या शिवाय ज्या पाशवी पद्धतीने त्याने मुलीचे हात- पाय तोंड बांधून निर्दयी अत्याचार केला, नंतर तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला, त्यावेळी त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले असण्याच्या शक्यतेपर्यंतही पोलीस तपास पोहोचला आहे.
मात्र त्याने हे अंमली पदार्थ नेमके कुठून मिळवले, त्याचा तस्करांशी आधीपासूनच संपर्क होता, का याचे मात्र कोडे उलगडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान आरोपीने अटक केल्यापासून भ्रमणध्वनीचा गुप्त क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी न्याय वैद्यक टीमकडे सुपूर्द केला आहे. टीमने अद्याप त्याचा अहवाल पोलिसांना सादर केलेला नाही. त्यामुळे ठाण्यातून नागपुरात आल्यानंतर आरोपी निर्भय पाखरे हा कोणा कोणा अंमली पदार्थ तस्कारांच्या संपर्कात होता, याची उकल करण्याचे आव्हान हुडकेश्वर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृहात
या घडामोडीत हुडकेश्वर पोलिसांच्या कोठडीत असताना आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याने गुरुवारी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यालानंतर त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्याची शुक्रवारी रात्री सुटी देण्यात आली. दरम्यान पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयासमक्ष उभे केले. त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपी निर्भयची रवानगी शनिवारी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
विमान प्रवासातून कशी आणली हत्यारे?
आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे हा घटनेच्या आदल्या दिवशी ठाणे येथून विमान प्रवास करत नागपुरात आला होता. त्याने येताना सोबत तीन प्रकारचे चाकू, सर्जिकल साहित्यात ब्लेड आणि कात्री सोबत आणली होती. ही हत्यारे त्याने विमान प्रवासातल्या लगेजमध्ये टाकून आणली होती. त्यामुळे विमानतळावरील स्कॅनरमध्ये ती दिसली नसण्याची शक्यता पाहता पोलिसांनी त्या दिशेने देखील तपास सुरू केला आहे.
पोलिसांसमोर संकटांची मालिका कायम
शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात पाशवी अत्याचार करणारा आरोपी निर्भय पाखरे याने अटक केलेल्या दिवसापासून तपासात असहकार्याची भूमिका घेतली आहे. डार्क वेबवरून माहिती गोळा करत पाशवी अत्याचार आणि खुनाचा कट रचणारा निर्भय वैद्यकीय तपासणीसाठी देखील तयार नव्हता. पाशवी अत्याचारानंतर पिडीताची हत्या करून पसार होण्याच्या तो तयारीत होता. त्याने बुक केलेल्या परतीच्या प्रवासाचे तिकीटाच्या नोंदीही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्या खोलीत आरोपी निर्भयने पिडितेला बांधून ठेवून अत्याचार केला त्या खोलीत दिसलेले दृष्य भयपटाला शोभावे असे होते. हात आणि गळ्यावर चाकूचे वार असल्याने मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. आकाशकडे सापडलेल्या बॅगमध्ये अश्लिल साहित्य आणि तीन चाकू, सर्जिकल साहित्यात ब्लेड आणि कात्री पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
