नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागपूर-ग्वाल्हेर आणि नागपूर-हैदराबाद या दोन महत्त्वाकांक्षी आर्थिक कॉरिडोर्सच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला. यामुळे मध्य भारत थेट दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे. अलीकडेच दिल्ली येथे गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन्ही महामार्गाचा आढावा घेण्यात आला.

मध्य आणि दक्षिण भारत एकत्र

नव्या महामार्गांमुळे केवळ उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारणार नाही, तर पुण्याचा मध्य भारताशी आणि पर्यायाने दक्षिण भारताशी असलेला संपर्क वेगवान होणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र असल्याने, या कॉरिडोर्समुळे लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. पुणे आणि लगतच्या औद्योगिक पट्ट्यातून दक्षिण आणि उत्तर भारतात होणारी मालवाहतूक आता कमी वेळात आणि सुरक्षितपणे पूर्ण करणे शक्य होईल, ज्यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

ग्वाल्हेर-नागपूर-हैदराबाद

ग्वाल्हेर-नागपूर आणि नागपूर-हैदराबाद हे दोन्ही कॉरिडोर्स केवळ रस्ते नसून देशाच्या आर्थिक विकासाच्या रक्तवाहिन्या ठरणार आहेत. नितीन गडकरी यांनी या प्रकल्पांचा आढावा घेत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ‘एनएचएआय’ला दिले आहेत. या कॉरिडोर्समुळे उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्ये थेट महाराष्ट्राच्या उपराजधानीशी म्हणजेच नागपूरशी जोडली जातील.

उद्योग आणि रोजगाराला मिळणार गती

या महामार्गांच्या निर्मितीमुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नवीन औद्योगिक वसाहती, लॉजिस्टिक पार्क्स आणि ‘वे-साईड अ‍ॅमेनिटीज’ (प्रवासी सुविधा केंद्रे) उभारण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ऑटोमोबाईल, आयटी आणि कृषी क्षेत्रातील उत्पादनांची वाहतूक जलद गतीने करणे शक्य झाल्याने मध्य भारतातील बाजारपेठांना मोठी आर्थिक उभारी मिळेल.

‘एनएचएआय’चा हाय-स्पीड अ‍ॅक्शन प्लॅन

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, अपघात विरहित प्रवासासाठी सुरक्षा उपाय आणि पर्यावरणपूरक हरित पट्टे या कॉरिडोर्सचे मुख्य वैशिष्ट्य असतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या थेट देखरेखीखाली हा प्रकल्प वेगाने मार्गी लावला जात असून, आगामी काळात हा कॉरिडोअर देशातील वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.