नागपूर : नागपुरात भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने आधी स्वतः ‘गोल्ड लोन’ घेऊन बँकेत पत निर्माण केली. त्यानंतर कामगारांसह इतर व्यक्ती कर्जदार म्हणून पुढे आले, कथित बनावट सोने तारण ठेवले गेले आणि कोट्यवधींची कर्जे मंजूर झाली. एका दागिन्याच्या शुद्धतेवर संशय आल्यानंतर सुरू झालेल्या तपासाने तब्बल २३ कोटी ३१ लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचे धागेदोरे उघड केले.

नेमके प्रकरण काय?

आयसीआयसीआय बँकेच्या विविध शाखांत बनावट सोने तारण ठेवून कर्जदारांच्या नावाने ‘गोल्ड लोन’ घेत २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. धंतोली पोलीस ठाण्यात ३० मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एका दागिन्याने संशय कसा वाढवला?

१८ ऑक्टोबर २०२५ रोजी नियमित लेखापरीक्षणात एका कर्जखात्यात तारण ठेवलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली. मूळ तक्रारीत नुकसान २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपये नमूद होते. तपासात ते २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपये असल्याचे समोर आले.

तपास १५२ खात्यांपर्यंत कसा पोहोचला?

मनीषनगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन शाखांतील १५२ ‘गोल्ड लोन’ खात्यांची छाननी करण्यात आली. बँक अभिलेख, ‘केवायसी’ कागदपत्रे, सीसीटीव्ही चित्रण, मोबाइल कॉल तपशील आणि आर्थिक व्यवहार तपासण्यात आले.

भंगार व्यावसायिकाने नेमके काय केले?

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सचिन राऊत हा भंगार व्यावसायिक आहे. त्याने २०१८-१९ मध्ये स्वतःच्या नावाने ‘गोल्ड लोन’ घेऊन बँकेत पत निर्माण केली. त्यानंतर कामगारांसह इतर व्यक्तींच्या नावाने कर्जे घेण्यात आली. काही बँक अधिकाऱ्यांनी विविध शाखांतून कर्ज मिळविण्यास मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

बनावट सोने ‘खरे’ कसे ठरले?

मूल्यनिर्धारक नंदू खरवडे याने १५५ कथित बनावट दागिन्यांचे मूल्यांकन केल्याचा आरोप आहे. प्रत्येक अहवालासाठी त्याला पाच हजार रुपये दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने परिचित, मित्र आणि नातेवाईक अशा ३८ जणांना कर्जदार म्हणून पुढे केल्याचा आरोप आहे. कर्जाची रक्कम खात्यांत जमा झाल्यानंतर ती अन्य खात्यांत वळविण्यात आली. तीन लेखापरीक्षकांनीही कथित बनावट दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचा अहवाल देण्यासाठी पैसे स्वीकारल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

आता तपास कुठे पोहोचला?

बँक अधिकारी, मूल्यनिर्धारक आणि लेखापरीक्षकांच्या भूमिकेची पडताळणी सुरू आहे. आणखी व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.