IIIT Nagpur Student Suicide : नागपूर: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ट्रीपल आयटीमधील द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या श्रेयश माने या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्तेनंतर संस्थेमधील अनेक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत.
येथील विद्यार्थ्यांनी लोकसत्ताशी बोलताना आत्महत्तेनंतर संस्थेमधील निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेवर चिंता व्यक्त केली. तसेच, प्रशासनाच्या चुकांमुळे विद्यार्थी कसे मानसिक दडपणात आहेत, याचीही माहिती दिली. श्रेयश मानेच्या आत्महत्तेनंतर त्याचा मृतदेह पहाटे साडेचार ते दुपारी १२ वाजतापर्यंत वसतिगृहाच्या आवारात तसाच पडून राहिल्याची धक्कादायक माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.
जिवंत आहे का हेही तपासले नाही
ट्रीपल आयटीमधील श्रेयश माने या विद्यार्थ्याच्या आत्महत्तेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेने येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्रीपल आयटी प्रशासन आणि वसतिगृहाच्या गृहपालाविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयशच्या आत्महत्तेची माहिती पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान मिळाली. विद्यार्थ्यांना माहिती होताच त्यांनी प्रशासनाला सांगितले. त्यानंतर पहाटे ६ वाजता पोलीस आले. परंतु, श्रेयशचे शरीर एका कापडाने झाकून ठेवण्यात आले. परंतु, पहाटे ४.३० वाजतापासून तो जिवंत आहे का?, त्याला रुग्णालयात नेण्याची गरज आहे का?, याची कुणीही साधी चौकशी केली नाही. त्याला प्राथमिक उपचार देण्याचाही कुणी विचार केला नाही. दुपारी १२ वाजतापासून वसतिगृह परिसरात त्याचा मृतदेह तसाच पडून राहिला. प्रशासनाने या प्रकरणात दुर्लक्ष दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
जागतिक संस्थेत रुग्णवाहिका, औषधालय नाही
आयआयआयटी ही जागतिक दर्जाची संस्था आहे. येथील वसतिगृहामध्ये तब्बल एक हजार विद्यार्थी राहतात. परंतु, साध्या रुग्णवाहिकेची सुविधाही येथे नाही. रुग्णवाहिकेच्या नावावर एक छोटे चारचाकी वाहन येथे ठेवण्यात आले आहे. ट्रीपल आयटी ही शहरापासून २२ किलोमिटर दूर आहे. येथून बुटीबोरी हे दुसरे शहरही १५ किलोमिटर अंतरावर आहे. असे असतानाही संस्थेमध्ये साधे औषधालय किंवा कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
परीक्षा रद्द करून प्रशासन गप्प
श्रेयशच्या आत्महत्तनंतर प्रशासनाने केवळ दोन दिवसांची परीक्षा रद्द केली. परंतु, त्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा साधी सांत्वनाही प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. विद्यार्थ्यांनी याविरोधात प्रशासनाकडे तक्रार केल्यावर मंगळवारी एक समिती तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या घटनेनंतरही संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांनी सोमवारी सायंकाळी संस्थेमध्ये भेट दिली. त्यामुळे या असंवेदनशीलतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
