नागपूर : देशातील आयआयटीमध्ये पाच वर्षांत ६५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांतच सुमारे ३० विद्यार्थ्यांनी स्वत:चे जीवन संपविले असून, त्यात आयआयटी कानपूरमधील सर्वाधिक ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयआयटी खरगपूरमध्ये ७ आत्महत्या झाल्या आहेत. २ वर्षांत आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पुन्हा एक घटना घडली. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूरमधील श्रेयश माने या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. तंत्रज्ञान संस्थांमध्ये वारंवार घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशीच आत्महत्या

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर ही महाराष्ट्र येथे असलेली एक भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था आणि भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षण संस्था आहे आहे. या संस्थेमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या श्रेयश माने या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. सोमवार, ०४ मेपासून ट्रीपल आयटीमधील परीक्षा सुरू होणार होती. श्रेयश अनेक दिवसांपासून वर्गात येत नव्हता. तो नियमित विद्यार्थी नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, तो वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावर राहत नव्हता. असे असतानाही तो तेथे गेला आणि नवव्या माळ्यावरून उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला. बुटीबोरी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती आहे.

यूजीसीने दिल्या होत्या सूचना

यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग)ने वाढत्या आत्महत्यांची गंभीर दखल घेतली असून त्या रोखण्यासाठी काही उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यूजीसीने सर्व उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या आवारात ‘काउन्सिलिंग सेंटर्स’ स्थापन करणे अनिवार्य केले आहे, जिथे व्यावसायिक समुपदेशक उपलब्ध असतील. तसेच जातीआधारित भेदभावास मनाई, शिक्षण संस्थांमध्ये जाती, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव होऊ नये, यासाठी यूजीसीकडून नियमावली लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक संस्थेत ‘इक्वल अपॉर्च्युनिटी सेल’ आणि भेदभावविरोधी अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र, या नियमावलीला विरोध झाल्याने ती तूर्तास लागू करण्यात आलेली नाही.