नागपूर : गरजू सेवानिवृत्त शिक्षकाला दिलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात सहा लाख १० हजार रुपये उकळून त्याला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. धमकी देत त्याचे घर आणि भुखंडही गिळंकृत केल्याचा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी अवैध सावकारी करणारा कुख्यात कमलेश गणपतराव हनोते (४०)आणि पत्नी अनिता पुरणलाल भारद्वाज या दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे.
काय आहे नेमकं प्रकरण….?
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप श्रीराम कुंभारे (५९) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. वैयक्तिक कामासाठी त्यांना एप्रिल २०२४ मध्ये काही मोठ्या रकमेची गरज होती. दरम्यान मित्र विक्रम विजय मेश्राम याने त्यांची ओळख कमलेश हनोतेशी ओळख करून दिली. हनोतेने १० टक्के व्याजाने पैसे देत असल्याचे सांगून कुंभारे यांना दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले.
हनोतेने फोन-पेच्या माध्यमातून कुंभारे यांच्या खात्यात एक लाख, तर मुलीच्या खात्यात ९९ हजार रुपये जमा केले. त्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत हनोते याने कुंभारे यांच्याकडून एक्सिस बँकेचे दोन कोरे धनादेश आणि १०० रुपयांचा कोरा सही केलेला दस्त ठेवून घेतला.
धमकी देत तिप्पट रक्कम उकळली …
दरम्यान २५ मे २०२४ मध्ये हनोते आणि मेश्राम हे दोघे कुंभारे यांच्या घरी गेले. दोन लाख रुपये व्याजासह लगेच परत कर, अशी मागणी करत शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली. घर खाली करण्यासाठी दोघांनी कुंभारे यांच्यावर दबाव आणला. दरम्यान तडजोडीच्या नावाखाली कुंभारे यांच्याकडून आणखी ६ लाख १० हजार रुपये घेतले. यानंतर हनोते याने बेसा येथील पिपळा येथील कुंभारे यांच्या भुखंडावरही हक्क सांगितला. ३ जानेवारी २०२५ रोजी दबाव आणून या भुखंडाची नोटरी करून घेत ताबा देखील मिळवला. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी अंती हा गुन्हा दाखल केला आहे.
कमलेशसह पत्नीवर चौथा गुन्हा
कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे सक्करदरा येथील एकाला कर्ज देत, त्याच्याकडून १२ लाख रुपये उकळले होते. यासंदर्भात पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनाही अटक झाली होती. सध्या तो कारागृहात आहे. त्यानंतर इमामवाडा आणि अजनीमध्ये त्याने अशाच प्रकारे धमक्या देऊन पैसे उकळल्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. आता बेलतरोडी पोलिसांनी देखील हनोते दाम्पत्यावर असाच पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.
