नागपूर : सीताबर्डी, महाल, रामदासपेठ, धरमपेठ, धंतोली, सदर, इतवारी, सक्करदरा, बेसा, मेडिकल चौक, बेलतरोडी सारखे भाग शहरात अत्यंत वर्दळीचे आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या भागांपैकी एक आहेत. मात्र सीताबर्डी आणि महाल सोडला तर बहुतांश सर्वत्र वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नाही. परिणामी येथे वाहनतळांच्या नावाखाली पार्किंग माफियांचे वसुली साम्राज्य उभे ठाकले आहे. यातून नागरिकांचा राजरोसपणे खिसा कापला जातो.

या ठिकाणी समस्या बिकट

धंतोली, रामदासपेठ सारख्या रुग्णालयाच्या गर्दीत बाहेर जिल्ह्यातील रुग्ण नातेवाईकांकडून अक्षरशः वसुली केली जाते. तेच चित्र बाजारपेठांचा परिसर असलेल्या धरमपेठ, गोकुळपेठ, सीताबर्डी, महाल आणि मेडिकलमध्ये पहायला मिळते.

सीताबर्डीतला सशुल्क वाहनतळ पांढरा हत्ती

यावर पर्याय म्हणून नागपूर सुधार प्रन्यास आणि महा नगर पोलिकेने सीताबर्डीत खासगी विकासकाच्या माध्यमातून व्हरायटी चौकात अमरावती मार्गावर सशुल्क वाहनतळ केंद्राचे बांधकाम केले.महापालिकेने महालमध्ये असा प्रकल्प सुरू केला. हे महाकाय प्रकल्प २०१३ मध्ये सुरू झाले. परंतु काही महिन्यातच वाहनतळ व्यवस्था पांढरा हत्ती बनला आहे. हा प्रकल्प दर तीन वर्षांनी देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आला. परंतु तो कधी बंद असतो तर कधी तिथे अतिरिक्त शुल्क वसुली केली जाते.

रॉय उद्योग समूहाने टीडीआरच्या मोबदल्यात हा प्रकल्प उभारला. येथे ७५ चारचाकी वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे. सुरुवातीला तीन वर्षे प्रायोगिक तत्त्वावर विकासकाने हा प्रकल्प चालवायचा होता. त्यानंतर यासाठी नवीन निविदा प्रक्रिया देखील झाली. मात्र पुढे हा प्रकल्प रेंगाळला.

संघटीत गुन्हेगारांकडून वसुली

शहरातल्या अत्यंत वर्दळीच्या आणि मुख्य बाजारपेठा असलेल्या भागांत वाहनतळांची व्यवस्थाच नसल्याने परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या संघटीत गुन्हेगारांनी मोकळ्या जागांमध्ये अनधिकृत वाहनतळे सुरू करून अक्षरशः वसुली सुरू केली आहे.

महाकाय प्रकल्पाला ११ लाखांचा तोटा

सीताबर्डीतल्या वाहनतळ केंद्रात उद्ववाहकाचा (लिफ्ट) वापर होत असल्याने विजेचा खर्च अधिक येतो. ही यंत्रणा सुरळीत सुरू राहण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज असते. सुरक्षा रक्ष आणि मनुष्यबळाची देखील गरज आहे. यावर होणारा खर्च व वाहनतळातून मिळणारे उत्पन्न गृहीत धरते वर्षाला ११ लाखांचा तोटा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून हा प्रकल्प चालवण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ही तूट भरून काढण्याठी विकासक मनमानी पद्धतीने वाहनतळ शुल्क आकारत आहेत.

वाहनधारकांची डोकेदुखी कायम

सीताबर्डी भागात वाहनतळांची पुरेशी सुविधा नसल्याने हा सशुल्क वाहतनळ उभारण्यात आला. परंतु याचा काहीही उपयोग होत नसल्याने वाहनधारकांची डोकेदुखीक कायम आहे. बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यात कुठेही वाहने उभी करतात. यातून रस्ता अरुंद होऊन वाहतूकीची कोंडी होती. यावर सुधार प्रन्यास विश्वस्त मंडळाच्या बैठकीत तातडीने निर्णय अपेक्षित आहे. परंतु विश्वस्तांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

अजनी रेल्वे समोर रोज लूट

अजनी रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर मेट्रो स्थानकाला लागून मेडिकलमध्ये सेवा देणाऱ्या तृतिय आणि चतूर्थश्रेणी कर्माचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या निवासी संकूल भागात प्रत्येक घराच्या समोर शेकडो दुचाकी आणि कार उभ्या दिसतात. वर्धा, पुलगाव, बुटीबोरी, चंद्रपूरपर्यंत रोज रेल्वेने ये- जा करणारे हजारो कर्मचारी येथे वाहने उभी करतात. त्यांची महिनेवारी वाहतळ वसुली केली जाते. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे ना, मनपाचे ना ही मेडिकल प्रशासनाचे. बेकायदेशीपणे वसुलीचा हा गोरखधंदा सुरू आहे.

वाहतनळ धोरण काय म्हणते…?

शहरातील बहुसंख्य मॉल, शैक्षणिक संस्था, बँका, सरकारी कार्यालये व व्यापारी संकुलात वाहनतळांची व्यवस्थाच नाही. ज्यांच्याकडे आहे, ते प्रतिष्ठान ग्राहकांकडून शुल्क वसूल करतात. यात सर्वसामान्यांची सर्रास आर्थिक लूट होत आहे. ही वसुली नियमानुसार आहे की नाही, याची चौकशी करण्यात यावी. नियमबाह्य असल्यास ती बंद करण्यात यावी. अन्यथा पे अँड पार्किंग व्यावसायिक असल्याने अशा वसुलीवर व्यवसाय कर आकारण्यात यावा, असे निर्देश तत्कालिन महापौर नंदा जिचकार यांनी दिले होते. नंतर त्याचे काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

धंतोली, रामदासपेठेत अक्षरशः वसुली

शहरातील अनेक मोठी खासगी रुग्णालये धंतोली आणि रामदासपेठेत केंद्रित झाली आहेत. यातील एकाही रुग्णालयाकडे स्वतःचे वाहनतळ नाही. ज्यांच्याकडे आहे, तिथे केवळ डॉक्टरांना वाहने लावण्यास परवानगी असते. त्यामुळे या परिसरात रस्त्यांवर वाहतनळ माफिया जन्माला आले आहेत. हे माफिया सर्रासपणे रुग्णांच्या नातेवाईकांना दमदाटी करून त्यांच्याकडून मनमानी पिद्धतीने वसुली करतात. अडलेला नातेवाईक अखेर पैसे देऊन वेळ मारून नेतो. धंतोलीतील रुग्णालयांकडे वाहनतळांची कसलीही सुविधा नसताना वाहतूक शाखा आणि मनपा मात्र मुकपणे या लूटीचा तमाशा पाहते.

रामदासपेठेत रस्त्यांवर चारचाकी

रामदासपेठ, गोकुळपेठ सारख्या भागांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि शिकवणी वर्गांची गर्दी आहे. त्यापैकी कोणाकडेही वाहतनळ नाही. या भागातील मॉल्सही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे येथे खरेदीसाठी येणारे ग्राहक सर्रासपणे रस्त्यांवर चारचाकी, दुचाकी वाहने लावून तासंतास खरेदी करत बसतात. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.

कॉफी हाऊसची नवी डोकेदुखी

रामदासपेठ, धरमपेठ, शंकरनगर, गोकुळपेठ, लक्ष्मीनगर, बजाजनगरात सध्या नवी डोकेदुखी सुरू आहे. या भागात कॉफी हाऊसचे अक्षरशः पेव फुटले आहे. रस्त्याच्या कडेला शेकडो कॉफी हाऊस रात्रंदिवस चालतात. येथे येणारे ग्राहक आपली वाहने एकतर रस्त्याच्या मधोमध उभ्या करतात, अन्यथा पदपथांवर वाहने लावली जातात. यातील अनेक कॉफी हाऊसेसनी पदपथ गिळंकृत केले आहेत. तरीही त्यांच्यावर मनपाचा अतिक्रमण विभाग दंडुका उगारत नाही.

मेडिकलचौकात दमदाटी रोजची

व्हिआर मॉल आणि बहुमजली निवासी संकुलांमुळे बैद्यनाथ चौक, गणेशपेठ, मेडिकल चौक झपाट्याने विकसीत झाला आहे. या भागांत गेल्या काही महिन्यांमध्ये टोलेजंग इमारतींमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू झाली आहेत. त्यामुळे येथे येणारा ग्राहकवर्ग वाढला आहे. त्यातून या भागात बेकायदेशीर वाहनतळ चालवणाऱ्यांचे माफिया राज जन्माला आले आहेत. हे वाहतनळ माफिया ग्राहकांना दमदाटी करून वाहनतळ शुल्क वसुल करतात. त्यातून सहज मिळणाऱ्या पैशांमधून गुंडगिरी आणि व्यसनाधिनता फोफावत आहे.

प्रशासनाची भूमिका काय

व्यावसायिक प्रतिष्ठानेच काय तर रुग्णालयांकडे देखील वाहतनळ नाही. यांचे नकाशे मंजूर करताना दाखवलेल्या वाहनतळांच्या जागेत औषधालये, पॅथॉलॉजी, कँटिन सारख्या बाबी सुरू आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला याची पुरेपुर कल्पना आहे. तरीही कारवाई होत नाही. व्हिआरमॉल, रामदासपेठ आणि धरमपेठेतल्या अनधिकृत वाहनतळ चालवणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
-आदित्य मिरखेलकर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

पार्किंगची समस्या निकाली काढण्यासाठी ‘स्ट्रीट पार्किंग’वर महापालिका काम करीत आहे. यासाठी शहरातील निवडक रस्त्यांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी तातडीने सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश प्रकल्प विभागाला दिले आहे. – मंगेश खवले, उपायुक्त, महापालिका.

नागरिकांच्या भावना काय

छत्रपती नगरसारख्या निवासी भागांत बेकायदेशील व्यावसायिक वाहनतळ सुरू आहेत. शुल्क-आधारित वाहनतळ धारकांकडून तासांवर वसुली केली जाते. यातून अनधिकृत वाहनतळ धारकांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कसलाही कायदेशीर परवाना नसलेले वाहनतळ चालक पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांच्या बाहेर बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करतात. महापालिकेच्या बनावट किंवा अनधिकृत पावत्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. -स्वप्निल काशिकर, अभियंता

बँकेत नोकरी करत असल्याने आम्हाला रोज किमान १५ ते २० ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जावे लागते. दरवेळी नव्याने वाहनतळ शुल्क वसुल केले जातात. वास्तविक प्रतिष्ठानांकडे स्वतःचे वाहनतळ असेल तर हा भुर्दंट वाचवला जाऊ शकतो. -अक्षय मेश्राम, बँक कर्मचारी.

सीताबर्डी सारख्या गजबजलेल्या भागांमध्ये देखील वाहतनळ पुरेसे नाही. ज्यांना बर्डीतल्या महाजन कॉम्प्लेक्स जवळील सशुल्क वाहतनळावर वाहन लावायचे नाही, ते खरेदीसाठी येणारे ग्राहक कुठेही आपल्या गाड्या उभ्या करतात. दुकानासमोर वाहन उभे करू नका असे म्हटले तर रोज वादावादी होते. पोलीस आणि महापालिकेने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. -विकास बोरिकर, कापड व्यावसायिक

“रस्ते, चौक आणि पदपथ चालण्यासाठी आहेत, की वाहने उभी करण्यासाठी ? हा प्रश्न शहरातला सार्वत्रिक आहे. वाढच्या कारमुळे समस्या बिकट होत आहे. महापालिका, वाहतूक शाखा आणि पोलिसांच्या डोळ्यांसमोर ही बेकायदेशीर लूट चालते. यातून गुंडगिरी फोफावत आहे. त्याची किंमत सामान्यांनी का मोजायची ? वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघाताचा वाढता धोका यांमुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. – स्वप्निल भोगेकर, खासगी कर्मचारी

अवैध पार्किंगचा पेच दूर करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंगचा नारा दिला होता. मात्र उपलब्ध वाहनतळाची ठिकाणे डिजिटल मॅपवर सहज दिसत नाहीत. शुल्कासह त्याची माहिती मिळाल्यास महापालिकेला महसूल मिळू शकेल. बेकायदेशीर वाहनतळांवर तातडीने बुलडोजर चालवले पाहिजेत. -अमित बोरकर, नागरिक