नागपूर : अमेरिका-इराण युद्धाच्या तणावामुळे मध्यपूर्वेतल्या विमानसेवेवर परिणाम होत आहे. कतारने शनिवारी आपल्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांची सुरक्षा कारणास्तव तात्पुरती बंदी घालली आहे. यामुळे कतार एअरवेजने दोहा-नागपूर-दोहा मार्गावर चालणारी सर्व उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कतार एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवाई मार्ग पुन्हा उघडण्याबाबत सध्या काही ठोस वेळापत्रक ठरलेले नाही आणि सुरक्षा परिस्थिती सुधारल्यावरच उड्डाणे सुरु होतील.
यासोबतच, एअर अरेबियानेदेखील सर्व विमानसेवा बंद करण्याचे जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम शारजाह-नागपूर-शारजाह मार्गावर पडत आहे. प्रवाशांनी आपले तिकीटे बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा पर्याय विचारात घेण्याचे आवाहन केले गेले आहे. प्रवाशांनी नवीन माहितींसाठी एअरलाइनच्या अधिकृत संकेतस्थळाची पाहणी करण्याचे सल्ला दिला जात आहे.
विशेष म्हणजे, या निर्णयामुळे नागपूरमध्ये अनेक प्रवाशांची यात्रा प्रभावित झाली आहे. दोहा आणि शारजाह सारख्या विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे, तर विमानतळ प्रशासन अतिरिक्त कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सहाय्य करत आहे. मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे विमानसेवा आणि प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिकता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शारजाह-नागपूर-शारजाह विमानसेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना
मध्यपूर्व आणि परिसरातील तणावामुळे भारत सरकारने त्या भागातील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सुचना जारी केल्या आहेत. पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि युएई (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन व दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत दूतावासांच्या २४ तास हेल्पलाइनवर संपर्क साधावा. महाराष्ट्र शासनाने देखील परदेशातील नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे, अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक असल्यास तात्काळ दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
