scorecardresearch

सडकी सुपारी व्यवसायाचे केंद्र नागपूर ; महिन्याकाठी कोटय़वधीची उलाढाल

अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर : देशभरात सडकी सुपारी वितरित करण्यासाठी नागपूर शहर केंद्रस्थानी असून नागपुरातून महिन्याकाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, सडक्या सुपारीच्या अवैध व्यवसायाकडे पोलीस प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन आणि संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.आणखी वाचा“पंढरपूरसह देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप”; प्रबोधनकार, आंबेडकरांचा संदर्भ देत डॉ. आगलावेंचा […]

अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : देशभरात सडकी सुपारी वितरित करण्यासाठी नागपूर शहर केंद्रस्थानी असून नागपुरातून महिन्याकाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, सडक्या सुपारीच्या अवैध व्यवसायाकडे पोलीस प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन आणि संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

देशभरात सुपारीची मागणी बघता सडक्या सुपारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे. वाहतुकीसाठी उपराजधानी केंद्रस्थानी असल्यामुळे देशभरात नागपुरातूनच सडकी सुपारी पाठवली जात असल्याची माहिती आहे.

या व्यवसायात सुपारी तस्कर केंद्रासह राज्य शासनाचा कोटय़वधी रुपयांचा करचोरी करीत आहेत. या व्यवसायाचे तार इंडोनेशिया, नायजेरिया, थायलंड व श्रीलंकेशी जुळले आहेत.

या देशातील निकृष्ट सुपारी समुद्रमार्गे श्रीलंकेत येते. तेथून बांग्लादेश मार्गे छुप्या पद्धतीने आसाम, मेघालय, गुवाहटी आणि नागालॅन्ड मार्गाने नागपुरात आणली जात असल्याची माहिती आहे. यासह केरळ व तामिळनाडू राज्यात उत्पादन होणाऱ्या सुपारीचे विलगीकरण केल्यानंतर निकृष्ट सुपारीसुद्धा नागपुरात आणली जाते. त्यामुळे नागपूर हे सुपारीसाठी वितरण केंद्र बनले असून अनेक तस्कर आणि दलाल या व्यवसायाच्या

माध्यमातून कोटय़वधीची कमाई करीत आहेत. या तस्करांना काही वादग्रस्त पोलीस कर्मचारी आणि अन्न व औषधी विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा आहे.

नागपुरातील अवैध सुपारी तस्करांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा छापे घालून सुपारी जप्त केली आहे. शहरात अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर

अशी केली जाते प्रक्रिया

विदेशातील सडलेली सुपारी भारतात आणल्यानंतर मोठमोठय़ा गोदामात साठा केला जातो. सुपारी तस्कर हे गंधक आणि काही घातक रसायने टाकून सुपारीची भट्टी लावतात. सडलेली सुपारी रसायनामुळे टणक तसेच पांढरी बनवली जाते. भट्टीतून सुपारी थेट काप करणाऱ्या कारखान्यात पोहचवली जाते. त्यानंतर खर्रा, सुगंधीत सुपारी, गोड सुपारी, पान मसाला तयार करण्यासाठी वापरली जाते.

सुपारी व्यवसायातील बडे मासे

नागपुरात कॅप्टनने पहिल्यांदा सडक्या सुपारीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यात वसीम, बावला, अल्ताफ, भोपाली, खत्री, गोयल, गणी, मोरवानी, टुटेजा, नितीन, जतीन, पटवा, मेहता, राजू, रवि अण्णा, कोठारी, आसिफ, कली, जैन, इरफान, महेश, अनुप, विक्की, हारूभाई, नेपाली, आनंद, महेंद्र काल्या, वेनसानी, गणपत्ती आणि तिरूपती यांची नावे चर्चित आहेत. यापैकी अर्धेअधिक पोलिसांच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे.

कशी होते वाहतूक

आंतरराष्ट्रीय बाजारात इंडोनेशिया हा सुपारी उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. तसेच श्रीलंका आणि नायजेरियातही सुपारी उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. समुद्रमार्गाने श्रीलंकेतून बांग्लादेश उतरविल्या जाते. तेथून मोठमोठय़ा कंटेनरने आसाम, मेघालय, गुवाहटी आणि नागालॅन्ड येथे आणल्या जाते. तसेच रेल्वे आणि ट्रकद्वारे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आदी भागात मोठय़ा प्रमाणात तस्करी करण्यात येते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur is the center for rotten betel nuts business zws

ताज्या बातम्या