नागपूर : शहरातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयटी पार्क परिसरात गेल्या काही वर्षांत खासगी स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा शिकवणी संस्थांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातही ॲलनसारख्या मोठ्या शिकवणी वर्गात दररोज हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यातच शॉपिंग मॉल्सची वर्दळ, रस्त्यावरील अनियोजित पार्किंग, खासगी सुरक्षा रक्षकांकडून होणारे वाहतूक नियंत्रण आणि पथपदांवरील अतिक्रमण यामुळे आयटी पार्क परिसर आता वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे.
दररोज सकाळी आणि सायंकाळी वर्ग सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत आयटी पार्क परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. चारचाकी, दुचाकी, शालेय वाहने, कॅब सेवा आणि पालकांची वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत होते. याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहत नसून आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि या मार्गाचा वापर करणाऱ्या इतर वाहनचालकांनाही त्याचा फटका बसतो.
खासगी सुरक्षा रक्षकांकडून वाहतूक नियंत्रण?
आयटी पार्कच्या नजिक गायत्रीनगर परिसरातील नीलेश भार्गव म्हणाले, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिकवणी संस्थेने नियुक्त केलेले खासगी सुरक्षा रक्षक अनेकदा रस्त्यावर वाहने थांबवणे, वळवणे किंवा मार्ग मोकळा करून देण्याचे काम करतात. मात्र सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचे अधिकार हे वाहतूक पोलिसांकडे असतात. त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली जाते. अनेक वाहनचालकांनी यावर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण होत असल्याची तक्रार केली आहे.
शॉपिंग मॉल्समुळे ताण वाढला
आयटी पार्क परिसरात दोन मोठे शॉपिंग मॉल आहेत. तेथे दिवसभर ग्राहकांची वर्दळ असते. सुट्टीच्या दिवशी आणि सायंकाळच्या वेळेत त्यात आणखी भर पडते. त्याचवेळी शिकवणी वर्गांच्या वेळा असल्याने वाहतुकीचा ताण अनेकपटींनी वाढतो. नियोजनाअभावी मुख्य रस्त्यावरच वाहने थांबवण्याची वेळ येते आणि काही मिनिटांतच वाहतूक कोंडी निर्माण होते.
पथपदांवर अतिक्रमण
या परिसरातील पथपदांवर चायनीज, फास्ट फूड तसेच अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध व्यावसायिक दुकाने उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांसाठी असलेली जागाच कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागते. वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये पादचाऱ्यांची भर पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
आयटी पार्कची प्रतिमा धोक्यात
शहरातील आधुनिक व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित आयटी पार्क परिसरात देशातील नामांकित कंपन्यांची कार्यालये आहेत. या परिसरात दररोज हजारो आयटी व्यावसायिकांची ये-जा असते. मात्र वाढती वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न यामुळे या परिसराची नियोजनबद्ध प्रतिमा धूसर होत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रशासनाकडून समन्वित कृतीची गरज
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, केवळ वाहतूक पोलीस तैनात करून हा प्रश्न सुटणार नाही. शिकवणी संस्था, महापालिका, वाहतूक पोलीस, नागपूर सुधार प्रन्यास आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्त आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. वर्गांच्या वेळांमध्ये बदल, विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, रस्त्यालगतच्या पार्किंगवर नियंत्रण, अतिक्रमण हटवण्याची मोहीम आणि पथपाद मोकळे करण्यासाठी विशेष कारवाई केल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
नागरिकांचे प्रश्न काय?
-शिकवणी वर्गामुळे होणाऱ्या गर्दीसाठी वाहतुकीला वेठीस धरणे अयोग्य
-सार्वजनिक रस्ते, पथपदावर विद्यार्थ्यांची वर्दळ धोकादायक.
-अपघात घडल्यावर प्रशासन जागे होणार का?
-वाहतूक विभाग प्रभावी उपाययोजना का करीत नाही ?
-खासगी शिकवणी वर्गासाठी सरकारचे काही नियम नाहीत का?
‘शिकवणी वर्गामुळे वाहतुकीवर काहीही परिणाम पडत नाही. आमचे अनेक सुरक्षा रक्षक व्यवस्थेत असतात. तसेच शिकवणी वर्ग सुटल्यावरही अवघ्या दहा मिनिटातच संपूर्ण परिसर रिकामा होतो. तरीही काही आवश्यक उपाययोजना असल्यास त्याही केल्या जातील.’
-ॲलन शिकवणी संस्था.
‘पदपथावर आपण कुणालाही दुकान लावण्यास परवानगी देणार नाही. सतत महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. तेथील परवानाधारक विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे सुरू आहे.’
-मंगेश खवले, उपायुक्त महापालिका.
