How Third Railway Line affects Tiger Corridor सातपुडा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या नागपूर ते इटारसी या व्यस्त रेल्वेमार्गाचा विस्तार करणे आवश्यक असल्याने तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. वाघांच्या संचारमार्गाचा हा एक मोठा भाग आहे. हा रेल्वेमार्ग ज्या जंगलभागातून जातो, तो सातपुडा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा एकमेव वन्यजीव ‘कॉरिडॉर’ आहे.
हा संचारमार्ग केवळ वाघांच्या अस्तित्वासाठीच नव्हे, तर या भागातील इतर अनेक दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे योग्य संरक्षण उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
रेल्वेमार्गाला मंजुरी बिनशर्त नाही
तिसऱ्या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली असली, तरी ही बिनशर्त नाही. या रेल्वेमार्गामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर परिणाम होऊ नये, यासाठी वैज्ञानिक अभ्यास करून पुढील उपाययोजना कराव्या लागणार आहेत. वन्यजीवांसाठी उड्डाणपूल (ओव्हरपास) आणि इतर उपाय निश्चित करण्याची अट स्थायी समितीने घातली आहे. मध्य रेल्वेने वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी ३४ ओव्हरपासचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हे प्रस्ताव सविस्तर वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे करण्यात आलेले नाहीत, हा एक आक्षेप आहे. केवळ वनकर्मचाऱ्यांच्या निरीक्षणांवर आणि वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या नोंदींवर आधारित हे प्रस्ताव असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे. या ओव्हरपासचे अंतिम अभियांत्रिकी आराखडे तयार झाल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.
वाघांचा संचारमार्ग संवेदनशील
मध्य भारतातील हा संचारमार्ग वाघांसह इतर वन्यजीवांच्या हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. फेब्रुवारी २०२२ मध्ये सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून रेडिओ कॉलर लावलेली एक वाघीण याच संचारमार्गाचा वापर करून मेळघाटात पोहोचली होती. या संचारमार्गात अडथळे निर्माण झाल्यास वाघांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वन्यजीवांच्या अधिवासात बाधा निर्माण होणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेता योग्य उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. इटारसी-बैतूल दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९च्या विस्तारीकरणाचा विषय समोर आल्यानंतर याच संचारमार्गाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेषतः संवेदनशील परिसंस्थेमध्ये पायाभूत सुविधांचा विकास हा पर्यावरणाच्या शाश्वततेचा विचार करूनच झाला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रेल्वेमार्गाची लांबी १६० किलोमीटर
प्रस्तावित तिसरा रेल्वेमार्ग हा मध्य प्रदेशातील जुजहारपूर (बैतूल) ते चिचोंडा (नर्मदापूरम) या दरम्यान उभारला जाणार असून त्याची लांबी १६०.६ किलोमीटर आहे. हा मार्ग इटारसी ते नागपूर या व्यस्त रेल्वेमार्गावरील प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा भाग आहे. मध्य रेल्वेने या मार्गाचे नियोजन केले आहे. हा रेल्वेमार्ग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातून जात असल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रात, तर सातपुडा व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशात आहे. दोन्ही व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा हा मार्ग वाघ, बिबट्या, अस्वल, हरणांसह इतर अनेक वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या परिसराचे तुकडे होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी २०६.०९ हेक्टर जमीन लागणार असून, त्यापैकी ७४.६९ हेक्टर वनक्षेत्र आणि १३१.४० हेक्टर बिगर वनक्षेत्र अधिसूचित व्याघ्र मार्गात येते.
सातपुडा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार, सातपुडा व्याघ्र प्रकल्पात आता ५५ हून अधिक वाघांचा वावर असून, त्यापैकी जवळपास १० वाघांची प्रथमच नोंद झाली आहे. २०१८ मध्ये येथे ४५ वाघांची नोंद झाली होती. सुमारे २,१५० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या व्याघ्र प्रकल्पातील ५० हून अधिक वनगावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यानंतर तब्बल ११ हजार हेक्टर क्षेत्र गवताळ अधिवासात विकसित करण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत सिपना, गुगामल आणि आकोट वन्यजीव विभाग मिळून सुमारे दोन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. दीड हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र (क्रिटिकल टायगर हॅबिटॅट) म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात मेळघाट अभयारण्याचे ११.५० चौरस किलोमीटर, नरनाळा अभयारण्याचे १२.३५ चौरस किलोमीटर, अंबाबरवा अभयारण्याचे १२७.११ चौरस किलोमीटर व वान अभयारण्याचे २११ चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात २०२५ मध्ये ८५ वाघांची नोंद झाली आहे.
उपशमन योजना आवश्यक
या रेल्वेमार्गाच्या संदर्भात मध्य प्रदेश राज्य वन संशोधन संस्थेकडून सविस्तर वैज्ञानिक अभ्यास सुरू असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. हा अहवाल उड्डाणपुलांची संख्या, स्थान आणि रचना निश्चित करण्यासाठी आधारभूत ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थायी समितीने वैज्ञानिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाहणी समितीने पुन्हा प्रकल्प क्षेत्राची पाहणी करून वन्यजीव संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अंतिम शिफारशी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सातपुडा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या या महत्त्वाच्या भ्रमणमार्गात उपशमन योजना करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी व्यक्त केले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
