नागपूर: देशातील बहुसंख्य जनता गायीला केवळ पवित्र मानत नाही, तर तिला मातेचा दर्जा देते. असे असताना सरकार कोणत्या राजकीय मजबुरीमुळे गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यास टाळत आहे, हे समजण्यापलीकडे आहे, असे प्रतिपादन जमीयत उलेमा नागपूर जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद साबिर यांनी केले.

आगामी ईद-उल-अजहा (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा येथील जमीयत उलेमा कार्यालयात शांतता व सौहार्द राखण्यासाठी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते.

‘नफरत’ आणि हिंसाचार थांबवण्यासाठी निर्णय घ्या

मुफ्ती मोहम्मद साबिर यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, गायीच्या नावावर होणारी मॉब लिंचिंग, निष्पापांच्या हत्या आणि याद्वारे मुस्लिमांना बदनाम करण्याचे राजकारण आता थांबले पाहिजे. जर केंद्र सरकारने गायीला ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित केले, तर समाजात बंधुभाव वाढेल आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या वादांना व हिंसेला पूर्णविराम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मागणीला दुजोरा देत जमीयत उलेमा महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष हाफिज मसूद म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना सय्यद अर्शद मदनी यांनी सर्वप्रथम ही मागणी लावून धरली आहे. नागपूर आणि कामठीतील नागरिक या आवाजाला पाठिंबा देत असून, केंद्र सरकारने व खासदारांनी देशातील जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर करत गायीला तातडीने राष्ट्रीय पशू घोषित करावे.

स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

बैठकीत आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था, शांतता आणि मुख्यत्वे स्वच्छतेवर भर देण्यात आला. सरचिटणीस अतीक कुरेशी यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, कुर्बानीच्या वेळी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. नागपूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मुस्लिम बहुल भागांत कचरा कुंडीतील टाकाऊ पदार्थ दिवसातून दोनदा उचलण्याची व्यवस्था करावी. तसेच सणादरम्यान पाण्याची मागणी वाढते, त्यामुळे ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी कुरेशी यांनी केली.

शेवटी, नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही आम्हा सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहन उपाध्यक्ष मोहम्मद जाहिद अन्सारी व एजाज पटेल यांनी केले. या बैठकीला जमीयत उलेमाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.