नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज (२१ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता नागपूरच्या जामठा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे, कारण जामठा मैदान टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येसाठी ओळखले जाते. आजचा सामना हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा पाहणारा ठरू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे.
जामठा मैदानावर भारताने आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांत विजय, तर २ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि २०१६ च्या विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध भारताला येथे पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर खेळलेल्या तीन सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, जामठ्यावर भारताने शेवटचा टी-२० सामना २३ सप्टेंबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. न्यूझीलंड संघाने भारतात आजवर कधीही टी-२० मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या मालिकेत पाहुण्या संघासमोर इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र २०१६ मध्ये भारतात मिळालेल्या विजयाची आठवण आणि सध्याच्या फॉर्ममुळे न्यूझीलंड संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल, असे संकेत आहेत.
नागपूरला टी-२० यजमानपदाचे विक्रम
विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जामठा स्टेडियम भारतीय संघासाठी नेहमीच खास ठरले आहे. भारत–न्यूझीलंड टी-२० सामन्याच्या यजमानपदासह, हे मैदान आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या यजमानपदाच्या बाबतीत एक पाऊल पुढे जाणार आहे. आतापर्यंत येथे १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले असून, आजचा सामना हा १४ वा सामना ठरणार आहे. या यादीत कोलकात्याचे ईडन गार्डन्स दुसऱ्या स्थानावर आहे. नागपूरचे जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित करत आहे.
आज होणाऱ्या भारत–न्यूझीलंड पहिल्या टी-२० सामन्यासह नागपूरमध्ये सर्वाधिक (१४) आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषवणारे नागपूर आज या बाबतीत देशातील सर्वच मैदानांना मागे टाकणार आहे. या यादीत १२ सामन्यांसह कोलकात्याचे ईडन गार्डन्स दुसऱ्या क्रमांकावर असून, धर्मशाळात ११ सामने , बेंगळुरूत १० तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम या मैदानांवर ९ सामने झाले आहेत. टी-२० क्रिकेटसाठी अनुकूल खेळपट्टी, धावांसाठी पोषक वातावरण आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे नागपूरने अल्पावधीतच टी-२० क्रिकेटचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामकांकडून नागपूरला सातत्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचे यजमानपद दिले जात असल्याचे चित्र आहे.
