नागपूर : जपानीज गार्डनजवळ भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक देत सकाळी प्रभातफेरीवर निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडले. या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. जपानी गार्डनकडून काटोल नाकाकडे जाताना वन विभागाच्या कार्यालयासमोर ही भीषण दुर्घटना घडली.

कैलास सोंडिया (७४) असे कारने पाठीमागून धडक दिल्याने दगावलेल्या नागरिकाचे नाव आहे. ते नागपूरमधील अवस्थी चौक येथील रहिवासी होते.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या परिसरात तीन गाड्या भरधाव वेगाने जात होत्या; त्यापैकी एका ‘इनोव्हा’ गाडीने त्या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची पडताळणी केली जात आहे. परिस्थिती जन्य पुरावा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

नागरिकांची सुरक्षा पुन्हा एरणीवर

सेमिनरी हिल्स आणि सिव्हिल लाईन्स परिसरात पहाटेपासून रोज  शेकडोजण प्रभात फेरीसाठी जात असतात. त्यात आज  साडेपाचच्या ते सहाच्या सुमारास तीन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारमधील एका  इनोव्हा कारने ज्येष्ठाला जोरदार धडक दिल्यानंतर कार फुटपाथ वर चढत भिंतीवर जाऊन धडकली. त्यामुळे सकाळी या भागातील भरधाव वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.