नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर (अंबाटोली) भागात वीज पुरवठा खंडित असताना घडलेल्या दुर्दैवी अपघाताने एका कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला आहे. तेजस्विनी आके (८ ) ही मुलगी वीज नसताना बाथरूममध्ये चुकून गरम पाण्याने भरलेल्या बादलीला धडकली. बादली उलटल्यामुळे उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले आणि ती गंभीररीत्या भाजली. शरीराचा सुमारे ६६ टक्के भाग गरमपाण्यामुळे होरपळल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तेजस्विनीचा अखेर मृत्यू झाला.

जरिपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नगरमधील अंबाटोली भागात राहणारी तेजस्विनी आके रात्रीच्या वेळी अंघोळीच्या खोलीत गेली होती. त्याच वेळी अचानक वीज गेल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरला. प्रकाशाअभावी तिला बाथरूममध्ये ठेवलेली गरम पाण्याची बादली दिसली नाही. तिचा पाय बादलीला धडकला. त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली. तिच्या सोबत बादलीतील उकळते पाणी तत्काळ तिच्या अंगावर सांडले.

दुर्घटनेत होरपळली ६६ टक्के

गरम उकळते पाणी तेजस्विनीच्या अंगावर सांडल्याने ती गंभीररीत्या होरपळली. अपघातानंतर तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली. तिची गंभीर प्रकृती पाहून तिला उपचारासाठी तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. गरम उकळत्या पाण्यामुळे तिचे शरीर ६६ टक्के होरपळे होते, असा दुजोरा मेडिकलमधील डॉक्टरांनी दिला. परिस्थिती पाहता तिच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले, परंतु तिची प्रकृती चिंताजनकच होती.

उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

कुटुंबीय आणि वैद्यकीय पथकाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही तेजस्विनीच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. होरपळल्याच्या तीव्रतेमुळे तिची स्थिती गंभीरच राहिली. अखेरीस, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या निष्पाप मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाती मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला. मृत मुलाचे वडील तेजस आके (४०) यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित असताना अंधारात मुलाची एका बादलीला धडक झाल्याने हा अपघात घडला.