नागपूर : खापरखेडा पोलीस हद्दीत दहेगाव रंगारी येथे सराफा व्यापारी मंगेश मारोतकर यांच्यावर २४ जुलैला गोळीबार झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या हातातील सोने- चांदी आणि रोख रकमेसह १२ लाखांच्या एवजावर दरोडा टाकला. या घटनेला आता महिन्याभराहून अधिक काळ लोटला आहे. पण स्वतःला हायटेक म्हणवून घेत पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांना गोळीबार करून पसार झालेले हल्लेखोर अद्याप हाती लागलेले नाहीत.
नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी निघालेल्या मारोतकर यांना दरोडेखोरांनी धनगौरी बाबा मंदिराजवळ अंधारात घेरले. त्यांच्यावर थेट गोळीबार केला. यात सुदैवाने गोळी मारोतकर यांच्या डाव्या पायाला लागल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, हल्लेखोरांनी मारोतकर यांच्याजवळील १० लाख रुपयांची चांदी, दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा तब्बल १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला.
पक्का कट, पूर्ण पाळत… तरीही यंत्रणा अपयशी !
मारोतकर यांच्यावर झालेला हल्ला हा अचानक झालेला प्रकार नसून दरोडेखोरांनी पूर्ण पाळत ठेवून रचलेला पक्का कट होता. मारोतकर कधी दुकान बंद करतात, कुठल्या मार्गाने जातात, कुठे अंधार असतो, कुठे सीसीटीव्ही नाहीत, या सर्व गोष्टींची खडान् खडा माहिती दरोडेखोरांना होती. धनगौरी बाबा मंदिराजवळ अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी थेट गोळीबार केला. सुदैवाने गोळी पायाला लागल्याने मारोतकर यांचा जीव वाचला, मात्र १० लाखांची चांदी, दीड लाखांचे सोने आणि ३५ हजारांची रोख असा १२ लाखांचा ऐवज दरोडेखोर सहज पळवून नेण्यात यशस्वी झाले.
भांडेवाडी गोळीबारातही गुन्हे शाखेचे हात रिकामे!
खापरखेड्याची घटना ताजी असतानाच भांडेवाडीतील स्वामी नारायण मंदिराजवळ काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. मोटघरे अवघ्या काही मिनिटांपूर्वी आतल्या खोलीत गेल्याने वाचले. या घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत.
गुप्तचर यंत्रणा फोल, खबरेही सुस्तावले!
एकीकडे शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे गोळीबाराशी निगडीत तपासात गुन्हे शाखेच्या कुठलाच ठोस सुगावा हाती लागत नाही. त्यामुळे पोलिसांचे खबरे पूर्णपणे सुस्तावले आहेत आणि गुप्तचर यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, का अशी शंकाही उपस्थित होत आहे. यातून शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे सावट आहे. नागपूरकरांच्या सुरक्षेचा विश्वास कसा निर्माण करायचा हे आव्हान पोलीस आयुक्तांसमोर कायम आहे.
खापरखेडा येथे घडलेल्या गोळीबारीच्या गुन्ह्याची पद्धत पाहता सराफा व्यापाऱ्यावर पाळत ठेवून हल्ला झाला हे स्पष्ट होत आहे. यात सबळ असे पुरावे अद्याप हाती लागलेले नसले तरी मागील काही वर्षांपूर्वीची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे. भांडेवाडी गोळीबारातही शक्य त्या सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. – नविनचंद्र रेड्डी, सह पोलीस उपायुक्त
