नागपूर : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि कधी पावसाचा दीर्घ खंड या तिहेरी संकटामुळे मागील काही वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे सावट आले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून नागपूर जिल्ह्यासह परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याची वेळ आणली आहे. विशेषतः नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आणलेला शेतमाल पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूरसह विदर्भात मागील काही महिन्यांपासून शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे. अशा परिस्थितीत आलेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या विदर्भात तांदूळ, गहू, ज्वारी, तसेच भाजीपाला पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी काढणी पूर्ण होऊन माल बाजारात आणला जात आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांसह काढणी केलेल्या पिकांनाही फटका बसला आहे. अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे विदर्भातील शेतीपिकांचे कळमना बाजारात नुकसान पुन्हा एकदा समोर आले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागात ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यापारी व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोणत्या पिकाला फटका बसणार ?

हरभऱ्याच्या शेंगा ओलाव्यामुळे काळवंडण्याची शक्यता असून कळमन्यात गहू व तांदूळ भिजल्याने त्यांचा दर्जा खराब होण्याचा धोका आहे. तर शेतात लागलेल्या गहुला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, मिरची यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा, भाजीपाला व धान्याचा साठा पावसात भिजल्याने व्यापारी व शेतकरी दोघांचेही नुकसान झाले आहे. पावसापासून संरक्षणासाठी अपुरी व्यवस्था असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेकांनी बाजार समितीकडून तातडीने शेड्स व संरक्षणात्मक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

विदर्भातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ

नागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आहे. येथे नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आदी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. भाजीपाला, धान्य, कडधान्ये, फळे यांची दररोज मोठी उलाढाल येथे होते. बाजारात हजारो क्विंटल मालाची आवक होत असल्याने दरनिर्धारणावरही कळमना बाजाराचा प्रभाव राहतो. मात्र अपुरी शेड्स, साठवणूक व पावसापासून संरक्षणाची कमतरता यामुळे अवकाळी पावसात शेतमालाचे मोठे नुकसान होते.