नागपूर : येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरासमोर खेळत असलेला अडीच वर्षांचा मुलगा पाणी साठवण्यासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे मिनीमाता नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

कळमना परिसरातील मिनीमाता नगर, गल्ली क्रमांक १२ येथे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. परिसरात पाण्याची टंचाई असल्याने घरासमोर पाणी साठवण्यासाठी खड्डा खणण्यात आला होता. कुश राजेंद्र पटेल (वय अडीच वर्षे) हा मुलगा घराबाहेर खेळत असताना खेळण्याच्या नादात तो खड्ड्याजवळ गेला. आत काय आहे हे पाहण्यासाठी तो खाली वाकला असता त्याचा तोल गेला आणि तो डोक्याच्या भारावर खड्ड्यात पडला.

घटनेच्या वेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने प्रकार लक्षात येण्यास काही मिनिटे गेली. दरम्यान, मुलगा दिसत नसल्याने आईने शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात ‘मुलगा पडला’ अशी आरडाओरड होताच संपूर्ण वस्ती घटनास्थळी धावली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

कुशचे वडील राजेंद्र पटेल हे कळमना मार्केट यार्ड परिसरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले होते. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील प्रक्रिया करण्यात आली.

मिनीमाता नगर परिसरात बहुतांश कुटुंबे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. बाजार समिती जवळ असल्याने अनेक मजूर पहाटेच कामासाठी बाहेर पडतात. मात्र दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.