नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या ‘एसबीएल’ कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत १९ मृतदेहाचे पाकीट नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहचले आहेत. त्यापैकी १६ मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत असून तिघांच्या मृतदेहांचे अवशेष गाठोड्यातून आहे. परंतु गाठोड्यात किती व कुणाचे अवशेष हे स्पष्ट नसल्याने मृतदेह किती याबाबत स्पष्टता नाही.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारी दुपारी मेडिकलला भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तीन गाठोड्यात मृतदेहाचे अवशेष बघून मेडिकलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.
बारूद व डिटोनेटर तयार करणाऱ्या या कंपनीत सकाळी काम सुरू होताच अचानक स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राऊळगाव येथील ‘एसबीएल’ कंपनीत खाणकामासाठी लागणारे डिटोनेटर आणि इतर स्फोटके तयार केली जातात. कामगार नेहमीप्रमाणे कामावर हजर असताना डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याची माहिती आहे. धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावत होते.
३५ कामगार उपस्थित
घटनेच्या वेळी संबंधित विभागात सुमारे ३५ कामगार काम करत होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे आणि ढिगाऱ्यामुळे काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १६ हुन अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बहुतांश मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आहेत.
प्रशासनाची धाव; बचावकार्य वेगात
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जखमी कामगारांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
