डॉ. सुनीता सावरकर
नागपूर शहर डॉ. आंबेडकरपूर्व बहिष्कृत चळवळीचे व डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वातील आंबेडकरी चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या शहरात सामाजिक भेदभावाविरुद्ध अनेक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी इतिहासात घडल्याचे दिसून येते. नागपूर शहरातील कॉटन मार्केट, गड्डीगोदाम, बर्डी, उंटखाना, महाल, जरीपटका, इंदोरा, सिरसपेठ, हिवरीनगर, भानखेडा, खलासी लाईन, पाचपावली, जयताळा व कर्नलबाग इत्यादी भाग हे दलित शोषित समूहाने विषमतेच्या विरोधात केलेल्या संघर्षाची महत्त्वाची ठिकाणे आहेत. यामध्ये कामठी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. १८२१ मध्ये इंग्रजांनी हा भाग वसवला. आजचे कामठीचे स्वरूप हे काळानुरूप बदललेले दिसत आहे. ड्रॅगन पॅलेस सारखे आंतरराष्ट्रीय पर्यटकाच्या पर्यटनासाठी महत्त्वाचे असलेले केंद्र आहे. आजच्या नागपूर शहराच्या सामाजिक समतेच्या विकासाच्या आराखड्यात कामठी या भागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे दिसून येते.
दलित चळवळीच्या अभ्यासकांनी नागपूर शहरातील काही जागा व काही व्यक्तींच्या भेटी घेतल्याशिवाय त्यांचे संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. कामठीत राहणारे बाबू एल.एन. हरदास यांनी आंबेडकरी चळवळीला महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी दिलेला ‘जय भीम’ चा नारा आज जागतिक पातळीवर उच्चारला जाणारा महत्त्वाचा शब्द आहे. हा शब्द भारतातील व भारताबाहेरील आंबेडकरी व शोषित समूहासाठी प्रेरणास्थान बनला आहे. समता, संघर्ष, अधिकार, माणूसपण असे विविध अर्थ ज्या शब्दाचे आहेत त्याचा उगम नागपूर शहरात झाला. कामठीमध्ये बाबू एल.एन. हरदास यांनी ‘महरठ्ठा’ या वृत्तपत्राची सुरुवात केली. या वृत्तपत्रात तत्कालीन कालखंडातील मध्यप्रांतातील शिक्षण, सामाजिक भेदभाव व समाजाच्या जाती धर्म द्वेषविरहित निर्मितीसाठी कोणकोणत्या सुधारणा होणे गरजेचे आहे यासाठी काम करत होते. त्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध करत होते त्यामुळे दलित समूहासाठीच्या वृत्तपत्रीय चळवळीचे कामठी हे सुद्धा महत्त्वाचे केंद्र बनले.
नागपूर शहरामध्ये विदर्भ इतिहास मंडळ, विदर्भ साहित्य संघ अशा साहित्याशी संबंधित संस्था आहेत. दलित साहित्य, दलितांचा इतिहास लिहिण्यासाठी कामठीमधून सर्वप्रथम प्रयत्न झालेले दिसून येतात. बाबू एल.एन. हरदास यांनी १९३४ ला महार इतिहास संशोधन कार्यालय कामठी येथे स्थापन केले. त्याचे संचालक स्वतः बाबू हरदास हेच होते. १५ नोव्हेंबर १९३५ च्या पत्रामध्ये बाबू एल.एन. हरदास असे म्हणतात की, ‘आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, महार ज्ञातीचा इतिहास अस्तित्वात आणण्यासाठी सदरील कार्यालयाची स्थापना झाली असून असा इतिहास लिहिण्यासाठी आधारभूत माहिती व सामुग्री संग्रहित करण्याचा प्रयत्न आम्ही चालवला आहे.
आपणास हे माहीत आहेच की, हिंदुस्थानच्या ऐतिहासिक पुस्तकात महारांचा उल्लेख देखील क्वचितच आढळतो आणि मराठी वाङ्मयात अथवा इतर ग्रंथात महार जातीच्या वंशावर अगर पूर्वजांवर प्रकाश पाडणारी केवळ त्रोटक व असंबद्ध माहिती आढळते. निरनिराळ्या ज्ञातिवंशाचे इतिहास अस्तित्वात आले असता महारज्ञातीच्या इतिहासासंबंधी अजूनही निराशा असते. आम्ही महारज्ञातीने आपल्या वंशाच्या उन्नती व उत्पत्तीबद्दल अनभिज्ञ असणे उचित नाही हे आपणास पटेलच’ या महार इतिहास संशोधन संस्थेस श्रीमंत गौरीशंकर गजबे यांनी आश्रय दिला होता असा उल्लेख १९३५ च्या पत्रामध्ये आहे. या संस्थेने आधारभूत ग्रंथांची यादी व ते ग्रंथ मिळवण्याची ठिकाणे, हस्तलिखित कागदपत्रे व इतर माहिती राजा महाराजांकडून किंवा सरदारादींकडून इनाम जमीन सनद तांब्याचा अथवा धातूच्या पत्र्यावर दिलेला लेख किंवा इतर काही अधिकार मिळाले असतील ती माहिती बखरी, शिलालेख चित्रादीवरून मिळणारी माहिती संतांची चरित्रे अभंग फोटो कवी शाहीर मृतकांची माहिती व गाणे पोवाडे छंद लावण्या वगैरे फलटणीत किंवा लढाईत कामास आलेल्या महारांची माहिती गोळा करण्याचे योजिले होते.
नंतरच्या काळात आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांनी गोळा करण्याचे ठरवले असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात या संस्थेचे काय झाले यांनी इतिहास लिहिण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे जमा केली तसेच तो इतिहास लिहिला गेला किंवा नाही याविषयी कोणतीही माहिती आपल्याला आढळून येत नाही. आज काळाच्या पटलावर ज्याप्रमाणे इतर संशोधन संस्था नागपूरमध्ये आहेत तशी हीसुद्धा संशोधन संस्था उदयाला यायला हवी होती जी आज काळाच्या पडद्याआड कुठे हरवली माहीत नाही. जर ती असती तर मध्य प्रांत वऱ्हाड या भागातील महार समाजाचा प्राचीन अर्वाचीन इतिहास समजला असता महार ते बौद्ध हा प्रवास इतिहासाच्या साक्षी पुराव्यानिशी अत्यंत चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत झाली असती परंतु ही संस्था आज कुठे आहे आणि तिचे काय झाले याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कामठी हा भाग विशेषत्वाने कामगारांच्या राहण्याचा व काम करण्याचा भाग होय. या भागामध्ये बहुतेक वस्ती ही दलित कामगारांची होती विदर्भात बिड्या वळण्याची दोन मोठी केंद्रे म्हणजे एक गोंदिया आणि दुसरे कामठी या दोन्ही ठिकाणी शेकडो दलित कुटुंबे बिडी बांधण्याच्या उद्योगात गुंतलेली आढळतात. बाबू हरदास यांनी शुद्ध १९३१ ला स्थापन झालेल्या मध्यप्रांत वऱ्हाड बिडी कामगार संघाचे नेतृत्व केले. येथे बिडी कामगार प्रामुख्याने राहत असत. येथील दलित अस्पृश्य स्त्री-पुरुषांनी आंबेडकरी चळवळीला एक वेगळे बळ दिले. १९३६ ला कामठी भागातील १००० बिडी कामगारांनी ज्यामध्ये अस्पृश्य कामगारांची संख्या ही बऱ्यापैकी होती, मालकाविरुद्ध विजय मिळवला त्यांनी त्यांची मिळणारी दर हजारी सहा आणे मजुरी अपुरी आहे ती सात आणे असावी अशी मागणी केली. या कामगारांत बहुतेक मजूर हे महार होते.
पारंपरिक समाज व्यवस्थेत महार आणि परिवर्तनवादी चळवळींनी प्रबुद्ध बनलेला बौद्ध समाज असा झालेला सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक विकास समजून घेण्यासाठी कामठी या भागात झालेल्या चळवळी अत्यंत महत्त्वाच्या होय. या भागातील कार्यकर्ते, नेते यांनी कामठी हा भाग सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने जागृत ठेवला. त्यांनी वेळोवेळी परिवर्तनाच्या लढ्यात भाग घेतला. कामठीतील स्त्रियांनी वेळोवेळी संघर्षांमध्ये भाग घेतला. येथील दलित स्त्री मागे न राहता संघर्ष करत पुढे येत राहिली.
