नागपूर : दर्शनासाठी आलेल्या कोलकातामधील रहिवासी महिलेला जिवे मारण्याची धमकी देत कन्हान येथे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी जुनी कामठीतील गाडेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्ग्याच्या बाबासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डमडम पोलिसांकडून कन्हान पोलिसांकडे प्रकरण वर्ग
कोलकत्यातील डमडम पोलिसांनी दाखल केलेले प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बाबा ताजी जनवीरुद्दीन, त्याची पत्नी ताजी मुस्तफाफीरुद्दीन फैज, तेजस खोब्रागडे, बशरा फातेमा ताजी, मल्ला धुळे व अन्य, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीडित महिला कोलकात्यातील डमडम भागात राहते. ती दर्शनासाठी नेहमी जुनी कामठीतील दर्ग्यावर येते. नेहमीप्रमाणे एप्रिल महिन्यात ती मरियम अम्मा दर्ग्यावर आली. तिला ठार मारण्याची धमकी देत सहा जणांनी तिला डांबून ठेवले.
दुसऱ्या दिवशी कशीबशी स्वतःची सुटका करून घेत ती महिला रेल्वेने कोलकत्याला गेली. तिने तेथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर तिने डमडम पोलीस ठाण्यात ताजी जनवीरुद्दीन आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात तक्रार दिली. घटनास्थळ कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने डमडम पोलिसांनी प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केले. त्याचे दस्तऐवज बुधवारी पोलिसांना प्राप्त झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची कागदपत्रे कन्हान पोलिसांना प्राप्त झाली आहेत. मात्र, जबाब अद्याप नोंदविलेले नाहीत. त्यामुळे नेमका घटनाक्रम कसा घडला, याबाबत आता सांगता येणार नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
कोलकाता येथील रहिवासी ही महिला १८ एप्रिल रोजी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कामठीत आली होती. रात्री काही जणांनी तिचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी कशीबशी स्वतःची सुटका करून घेत महिला रेल्वेने कोलकत्याला गेली.
