नागपूर : पत्नीचा मृत्यू घरातील पायऱ्यांवरून पडल्याने झाल्याचे सांगितले. रुग्णालयातही तीच कहाणी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवालाने मृत्यूचे गूढ उकलले आणि पतीच्या कथित बनावाचा पर्दाफाश झाला. अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याच्या आरोपाखाली कपिलनगर पोलिसांनी पतीला अटक केली. विशेष म्हणजे, २००६ मधील खून प्रकरणात शिक्षा भोगून तो अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता.

कामगारनगरमधील न्यू म्हाडा कॉलनीत गुरुवारी रात्री ही घटना घडली. लक्ष्मी रोशन शहाकार (३३) असे मृत महिलेचे नाव असून, रोशन किशोर शहाकार (४२) असे आरोपी पतीचे नाव आहे. लक्ष्मी कपड्यांच्या दुकानात काम करायची, तर रोशन प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट म्हणून काम करीत होता.

वादाचे रूपांतर मारहाणीत; डोक्यावर जोरदार थपडा…

पोलिसांच्या माहितीनुसार, रोशनला लक्ष्मीच्या अनैतिक संबंधांचा संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मी कामावरून घरी परतल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या रोशनने तिच्या डोक्याच्या बाजूला वारंवार जोरात थपडा मारल्या. त्यामुळे लक्ष्मीला अंतर्गत दुखापती झाल्या. ती बेशुद्ध होऊन कोसळली.

पायऱ्यांवरून पडल्याची कहाणी; पण अहवालाने उघड केले सत्य…

लक्ष्मी बेशुद्ध झाल्यानंतर रोशनने तिला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. पत्नीचा मृत्यू घरातील पायऱ्यांवरून पडल्याने डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाल्याचे रोशनने सांगितले. रुग्णालयात आणि पोलिसांसमोरही त्याने हीच माहिती दिली. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात लक्ष्मीचा मृत्यू अंतर्गत दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. रोशनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

खून प्रकरणात शिक्षा भोगून नुकताच आला होता बाहेर…

रोशनचा यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात सहभाग होता. २००६ मध्ये पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणात त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर तो जुलैमध्ये कारागृहातून बाहेर आला होता. पॅरोलवर असताना त्याने आठ वर्षांपूर्वी भावाच्या मेहुणीशी, म्हणजेच लक्ष्मीशी विवाह केला होता.शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी रोशनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करीत आहेत.