नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एस. बी. एल. इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत रविवारला मोठा स्पोट झाला. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी आहेत. काहींच्या मृतांची ओळख पटणे कठीण आहे. त्यामुळे डीएनए तपासणी करून शव कुटुबीयांना देण्यात येणार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे.

अहवालानुसार ही घटना निष्काळजीपणातून घटली आहे. यासाठी कंपनीसोबतच पेसो, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिश) आणि कामगार विभागाचे अधिकारी जबाबदार आहे. पेसो, डिश व कामगार विभागाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचनांकडे कंपनीने कानाडोळा केला. तर सुरक्षा उपाययोजना होत नसताना या अधिकाऱ्यांकडून त्यावर आवश्यक कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असून यात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील कंपनीत झालेल्या स्पोटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची बैढक घेतली. बैठकीला वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, खासदार श्याम बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, या स्पोटात १९ जणांचा मृत्यू झाला. २३ जण जखमी असून यातील १३ जण अतिगंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणाची विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षकांची समिती चौकशी करेल. पेसो, डिश आणि कामगार विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यांचा दोष दिसून आल्यास त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल.

गेल्या वर्ष,दोन वर्षात ४० स्पोट झाले असून ४४ जणांचा मृत्यू झाला. परंतु अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. विभागीय आयुक्त सर्वच घटनांची चौकशी करतील आणि त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवतील. यामुळे या धोरणात काही सुधारणा करता येईल. घटनेनंतर कंपनी बंद आहे. परंतु कामगारांचा पगार सुरू राहणार आहे. मृतांची डीएनए तपासणी झाल्यावर शव संबंधित कुटुंबीयाना देण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.