नागपूर : स्मृतीभ्रंषाच्या अंधारात मार्ग भरकटलेली आई सापडत नसल्याने कावरा बावरा झालेल्या मुलाला काटोल पोलीसांच्या सतर्कतेमुळे सुखद धक्का बसला. पोलिसांची तत्परता, संवेदनशीलता आणि समाजमाध्यमांच्या ताकदीमुळे ८२ वर्षीय मातेला तिचे हरवलेले छत्र आणि कुटुंब पुन्हा मिळाले.
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील शेलगाव येथे राहणाऱ्या विमलबाई नत्थू लांजेवार (८२ ) या गेल्या काही काळापासून स्मृतीभ्रंषाच्या व्याधीशी झुंजत आहेत. १६ ऑगस्टच्या रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास, त्या काटोल शहराच्या रस्त्यांवर एकट्याच भटकत असताना दिसल्या. या आजींवर गस्त घालणाऱ्या पोलिसांची नजर पडली. विचारपूस केली, पण आठवणींच्या धुक्यात अडकलेल्या विमलबाईंना स्वतःचे नाव आठवत असले, तरी राहते घर आणि गाव पूर्णपणे विसरल्या होत्या.
पोलिसांची मायेची पाखर
अनोळखी शहरात, वयाच्या या टप्प्यावर एका वृद्ध महिलेला उघड्यावर सोडणे शक्यच नव्हते. काटोल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सर्वात आधी त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. खापा घोडन येथील ‘मानव विकास बहुउद्देशीय संस्थे’त त्यांची रात्रीच राहण्याची व जेवणाची आपुलकीने सोय करण्यात आली.
डिजिटल पोस्टने जोडली दुरावलेली नाती
विमलबाईंच्या मुलाचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण केवळ हतबल न ठरता, पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांचा कल्पकतेने वापर केला. विमलबाईंचे छायाचित्र आणि संदेशाचे एक डिजिटल बॅनर बनवून सोशल मीडियावर तातडीने प्रसारित करण्यात आले.
नेटिझन्सनीही ही भावना ओळखून ती पोस्ट वाऱ्याच्या वेगाने शेअर केली. सीमा ओलांडून ही बातमी मध्य प्रदेशात राहणाऱ्या त्यांच्या मुलापर्यंत, हेमराज लांजेवार यांच्यापर्यंत पोहोचली. आई हरवल्याच्या दुःखात बुडालेल्या हेमराज यांच्यासाठी ती पोस्ट म्हणजे जणू आशेचा किरण ठरली.
अश्रूंचे झाले आनंदाश्रू!
सोमवारी १७ ऑगस्ट रोजी हेमराज तातडीने धावतपळत काटोल पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसमोर जेव्हा मुलाने आईला पाहिले, तेव्हा २४ तासांची तडफड एका क्षणात विरून गेली. योग्य खातरजमा करून पोलिसांनी विमलबाईंना त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिले.
“पोलीस आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले,” अशा शब्दांत मुलाने अश्रू ढाळत काटोल पोलिसांचे आभार मानले. कायद्याची कडक चौकट जपणाऱ्या खाकी वर्दीमागेही एक संवेदनशील आणि माणुसकीने भरलेले हृदय धडधडत असते, याचाच प्रत्यय या घटनेने संपूर्ण परिसराला आणून दिला.
