नागपूर: काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटातील आणखी एक जखमी महिला रंजना उत्तम घागरे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सोमवारी पहाटे अपयशी ठरली. त्यामुळे या स्फोटातील मृतांची संख्या १८ वरून वाढत १९ वर झाली आहे. या घडामोडीत कामगारांच्या सुरक्षेशी निगडीत अक्षम्य हयगय केल्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवला आहे. पोलिसांनी एस.बी.एल. एनर्जी कंपनीचा मालक संजय चौधरी, आलोक चौधरीसह, छत्तीसगड येथील संचालक रवी कामरा, राकेश तिवारी आणि अन्य अशा एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी कामरा, तिवारीसह रविवारी मध्यरात्रीच ११ जणांना अटक झाली. न्यायालयाने सर्वांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

या घटनेमुळे देशभर संतापाची लाट असताना न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून घेतलेल्या डिएनए नमुन्यांचे युद्धपातळीवर विश्लेषण करण्यात आले. यात मृतांपैकी १५ जणांची ओळख पटली आहे. त्यामुळे हे मृतदेह सोमवारी रात्रीपर्यंत नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. जखमींपैकी रंजना उत्तम घागरे (३६) रा. शिक्षक कॉलनी कोंढाळी यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सोमवारी पहाटेच्या सुमारास अपयशी ठरली. दरम्यान जखमी रंजना यांचा मृत्यू झाल्यानंतर रंजना घागरे यांच्यावर कोंढाळी नजिकच्या दुधाळा स्मशानभूमीवर अत्यंसंस्कार करण्यात आले.

डीएनए अहवालानंतर १४ मृतदेह सुपूर्द

स्फोटात दगावलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यानंतर न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून डीएनए नमुने घेण्यात आले होते. त्याचे युद्धपातळीवर विश्लेषण करत प्रयोगशाळेने १४ जणांचा अहवाल सादर केला. त्यानंतर रविवारी रात्रीच शवविच्छेदन झालेल्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. रविवारी राउळगाव येथील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या शोभा तपासे, वर्षा टेकाम, सुनिता सलामे, प्रेमदास बागडे, गोपी कोये, मिना उईके, सविता काळमेघ, गायत्री शेंडे, संगिता पंचभाई, गणेश टोंगे, अनुसया पाटील, प्रतिक्षा वलके, राजु कुडमेते, सुनंदा चिंचखेडे आणि रंजना घोगरे यांची ओळख पटली आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या डीएनए अहवालानंतर या महिलांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले.

डीएनए नमुन्यांचे युद्धपातळीवर विश्लेषण करण्यासाठी उपचसंचालक अश्विन गेडाम यांच्या नेतृत्वाखालील २० तज्ज्ञांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करताना नुकसान भरपाईच्या धनादेशाची प्रतही देण्यात आली. ही प्रत तहसीलदारांकडे सादर केल्यानंतर नातेवाईकांना भरपाईची रक्कम मिळणार आहे.

आणखी चार अत्यवस्थ

रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात होरपळलेल्या आणखी चार जणांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. प्रशासाकडून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रुग्णालयाच्या वतीने लवकरच अधिकृत वैद्यकीय अहवाल दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालकासह सुपरवायझर अटकेत

राऊळगाव स्फोटके कंपनीत झालेल्या स्फोटापूर्वी कामगारांच्या सुरक्षेत अक्षम्य दिरंगाई करत १९ जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्रीच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. यात कंपनी मालक संजय आणि आलोक चौधरीसह, संचालक रवी कामरा, राकेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रशेखर रजवाड, सुपरवायझर विलास माळवे, सुधाकर उपरकर, सुरक्षा इंचार्ज राजेंद्र पारधी, पंकज पांडे, रोशन राऊत (उत्पादन व्यवस्थाप), संदिप सोलंकी ( वरिष्ठ व्यवस्थापक), प्रदिप शर्मा (व्यवस्थापक), निलकमल डोंगरे (फिलिंग उत्पादन व्यवस्थापक) या ११ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली. सोबतच पोलिसांनी आणखी १० जणांवरही गुन्हे दाखल केले.

त्याने वाचवले १६ महिलांचे प्राण…

काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी एसबीएल एनर्जी कंपनीत भीषण स्फोट झाला. यात पहिल्या दिवशी १८ जण दगावले. तर सोमवारी आणखी १ महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू संख्या १९ वर पोचली आहे. ज्या वेळी ही गंभीर घटना घडली त्यावेळी घटनास्थळी रक्त आणि हाडामासांचा अक्षरशः चिखल झाला होता. या भयावह परिस्थितीत प्रकल्पात हाहाकार माजलेला असताना युगेंद्र आदमान हा तरुण १६ जखमी महिलांसाठी देवदूत बनून धावला. जीवावर बेतणारे धाडस करत त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी होरपळत असलेल्या १६ जखमींना आगीच्या ज्वाळातून बाहेर काढले. परिसरात एकही रुग्णवाहिका अथवा प्रशासनाची गाडी नसतानाही त्याने स्वतःचे खासगी वाहन वापरत जखमींना वेळेत उपचार मिळावे यासाठी देखील धाडस दाखवले.