नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन १७ कामगारांचा बळी गेला आहे, तर १८ हून अधिक कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मतदही जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत जाहीर केली आहे. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणाही सक्रिय झाली आहे. सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भेट दिली.
त्यांच्यासोबत इतरही अधिकारी उपस्थित होते. मृतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणण्यात आले असून डीएनए चाचणीनंतर कुटुंबीयांना शव देण्यात येणार आहे. या स्पोटानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर सोमवारला याप्रकरणावर सोमवारला तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. वित्तराज्य मंत्री आशिष जयस्वाल बैठकीला उपस्थित राहतील. संबंधित कंपनीसह पेसोचे अधिकारी ही उपस्थित राहतील. बैठकीत नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयानंतर सर्व शव नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
यापूर्वी जिल्ह्याताली काही कंपन्यात स्पोट झाले असून कामगारांचा मृत्यू झाला. त्यामुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काही कंपन्या पेसो अंतर्गत येत असून तर काही कंपन्या राज्याच्या अधिकार क्षेत्रातील आहेत.
एशियन फायर वर्क येथे झालेल्या स्पोटानंतर त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून स्पोटक तयार करणाऱ्या कंपन्याची तपासणी करण्यात आली. यात सुरक्षा व्यवस्था व अटीचा भंग केल्याने एका कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई प्रशासना केली होती.
