नागपूर: काटोल तालुक्यात राऊळगाव. उंच डोंगराळ भाग. राऊळगाव पासून डावे वळण घेत दोन किलोमिटर आत गेल्यानंतर माळरान लागते. तेथून उजव्या बाजूला वळण घेतले की अडिच किलोमिटर आत जावे लागते. कच्च्या रस्त्याने आत गेले की एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड कंपनीचा परिसर लागतो. धुळीने माखलेला हा परिसर तसा शुष्क, कोरडा, डोंगराळ भाग. मात्र रविवारी तोही आक्रोश, किंकाळ्या आणि नातेवाईकांच्या अश्रूंनी अक्षरशः गहिवरून गेला. त्याला कारण ठरले अंगाचा थरकाप उडवणाऱ्या एका घटनेचे.

जिलेटिन डिटोनेटरच्या कांड्या तयार करणाऱ्या या कंपनीत सकाळी सातच्या सुमारास भीषण साखळी स्फोटांची मालिका घडली. या दुर्घटनेत १८ कामगारांच्या देहाची अक्षरशः चाळण झाली. जिथे घटना घडली तिथे कामावर गेलेल्या आप्तांचे हालहवाल कळावेत म्हणून जमलेल्या नातेवाईकांचे आक्रोश आणि हुंदक्यांनी अख्खा परिसर शहारून गेला. नातेवाईक पोलिसांना विनंत्या करत आमच्या नातेवाईकांची माहिती द्या, असे हुंदके देत होते.
स्फोटके तयार करणााऱ्या ज्या कंपनीत ही घटना घडली तिथे खाण आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या जिलेटीन कांड्यांचे फ्यूज लावून पॅकिंग केले जाते. ही कंपनी बंदुकांच्या काडतुसांना लागणारी गनपावडर आणि बुल्क, जिलेटीन डेटोनेटर कांड्यांसह डेटोनेटिंग फ्युज, कॉलम चार्ज स्फोटकांचे उत्पादन घेते. २००२ मध्ये स्थापीत या कंपनीचे नंतर चौधरी कुटुंबाने २०१६ मध्ये नियंत्रण मिळवले आहे.

येथील दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश आहे. यात आणखी १८ कामगार गंभीररित्या होरपळले आहेत. होरपळलेल्यांच्या जखमा पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

सुरक्षा ऑडिटवर प्रश्नचिन्ह

बाजारगाव परिसरातल्या अनेक स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. येथे वारंवार स्फोट घडत आहेत. बाजारगाव येथे काही महिन्यांपूर्वी सोलर कंपनीत दोन वेळा स्फोटाच्या घटना घडल्या. त्यानंतर पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संगठन (पेसो), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) कडे सहा महिन्यापुर्वीच केला होता पत्र व्यवहार करण्यात आला होता. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली न गेल्याने राऊळगावच्या घटनेत आणखी १७ जण दगावले. यावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य बारुद फॅक्टरी संघटना अध्यक्ष स्वप्निल वानखेडे म्हणाले, वेळीच दखल घेतली असती तर आज ही घटना टाळता आली असती. येथे काम करणारे कामगार अवघ्या १२ ते १३ हजारांत ८ तास कसल्याही सुरक्षेविना काम करतात. कामगारांच्या १२ तासांची शिफ्ट ८ तासांवर करण्यात आली आहे. मुळात स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीतील कामगारांच्या कामाचे तास ५ तास करावेत, अशी मागणी केली जात होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.