नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी एसबीएल एनर्जी लिमिटेड या बारूद आणि डेटोनेटर (विस्फोटक साहित्य) तयार करणाऱ्या कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या धक्कादायक घटनेत सुमारे १५ कामगारांचा मृत्यू झाला असून किमान १८ गंभीर जखमी झाले आहेत; त्यांना तात्काळ नागपूर येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही कामगार अजूनही आत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीची प्रतिक्रिया काय?

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील पॅकिंग युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटावर एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या कामगारांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कंपनीने, “या दुर्दैवी घटनेने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. या घटनेत बाधित झालेल्या सहकाऱ्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत,” असे नमूद केले आहे.

कंपनीने स्पष्ट केले की, सध्या जखमी कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता हेच सर्वोच्च प्राधान्य असून, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत आणि आवश्यक सहकार्य दिले जात असून, उपचारांसाठी कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेडने सांगितले की, घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याकरिता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांबरोबर कंपनीचे पथक समन्वयाने काम करत आहे. स्फोटानंतर सुरू असलेल्या अधिकृत तपासात कंपनी पूर्ण सहकार्य करत असून, तपास यंत्रणांनी मागितलेली सर्व माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

यासोबतच, कंपनीने आपल्या निवेदनात सुरक्षिततेबाबतची भूमिका अधोरेखित केली आहे. “आमच्या सर्व युनिट्समध्ये कडक सुरक्षा निकषांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. काटोल येथील घटनेप्रकरणी कंपनीस्तरावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीतील निष्कर्ष आणि पुढील माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल,” असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, काटोल येथील या स्फोटामुळे औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतानाच, कंपनीच्या या निवेदनाकडे प्रशासन आणि तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे. पुढील चौकशीनंतरच स्फोटाची नेमकी कारणे आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.