नागपूर : शहराला लागून असलेल्या आणि नव्यानेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आलेल्या खापरखेडा येथे रविवारी रात्री दोन गटांत पुन्हा तलवार आणि कोयताने रक्तरंजित थरार घडला. या हल्ल्यात तीन युवक जखमी झाले असून, या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी ६ कुख्यात आरोपींसह १० ते १२ साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
भर रस्त्यात खून थरार…
भर रस्त्यात ही थरारक घटना समोर आल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर कोणीतरी सोमवारी रात्री त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने आणखी खळबळ उडाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे. वार्ड क्रमांक २ मध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमके काय घडले काल रात्री….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रदीप जाने (१८) हा त्याचे मित्र हिमांशू कडू, रक्षित कापसे, रोहित मेश्राम, सिद्धांत सातनकर आणि पुनीत भगत यांच्यासह नागमंदिर चौकात उभा होता. आरोपींचा गट तेथे आला. सुरुवातीला कोयता फिरवून दहशत निर्माण करण्यात आली. त्यानंतर तलवारी, चाकू आणि काठ्यांनी बेछूट हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी हिमांशू कडू याच्यावर जीवघेणा वार केला. तर मुख्य रस्त्यावरील चहाच्या दुकानाजवळ रोहित मेश्राम आणि रक्षित कापसे यांना लक्ष्य करत बेदम मारहाण करण्यात आली.
जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले तरुण…
कोयता आणि शस्त्रांनी मारहाण करत असल्याने तरुण सैरभैर झाले. जीवाच्या आकांताने त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे आहेत फरार हल्लेखोर….
पोलिसांनी या प्रकरणी सूरज कावळे, संघर्ष बागडे, साहिल बागडे, शुभम उईके, सुदामा उर्फ डहाकेसह १० ते १२ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व कुख्यात आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून धाडसत्र सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.
