नागपूर : जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रविवारी सायंकाळी हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. धावत्या स्कूल बसचे पाठीमागील चाक अचानक निखळले. ते वेगाने रस्त्यावरून पुढे गेले आणि थेट समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडकले. हे चाक त्या तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्कूल बसच्या ‘फिटनेस’ (योग्यता) आणि तांत्रिक तपासणीच्या मोहिमेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सावली खुर्द येथील रहिवासी असलेले नामदेव महादेव घागरे हे दुचाकीवरून कोंढाळीहून घरी परतत होते. ते खापरी परिसराजवळ असताना, मागून येणाऱ्या एका स्कूल बसचे डाव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक निखळले. वेगाने पुढे गेलेल्या त्या चाकाने थेट नामदेव यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यांच्या डोक्यावरून ते चाक गेले.

या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. लोक या अपघातासाठी स्कूल बसच्या तांत्रिक देखभालीतील निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत. संबंधित बसची योग्यता (फिटनेस), देखभाल आणि तांत्रिक तपासणी यांची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कुटुंबाने गमावला कर्ता पुरुष…

अपघात इतका भीषण होता की नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्याचे दिसताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मृत नामदेव हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

शहर आणि जिल्ह्यातील शाळांना अलिकडेच सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि स्थानिक यंत्रणांनी शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे केले. त्यासाठी मोहिमही राबवली गेली. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्कूल बसच्या योग्यता तपासणी प्रक्रिया आणि परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सर्व शालेय वाहनांची तातडीने विशेष तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.