नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज केंद्रातील टर्बाइन देखभाल विभागात गरम वाफेच्या नळीत अचानक गळती झाल्याने चार कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील सहाशे साठ मेगावाँट क्षमतेच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील टर्बाइन देखभाल विभागात काम सुरू असताना गरम वाफ वाहून नेणाऱ्या नळीत अचानक गळती झाली. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात गरम वाफ बाहेर पडली. त्या वेळी जवळच काम करत असलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या हात व पायांवर गरम वाफ गेल्याने त्यांना किरकोळ भाजल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जखमी कामगारांची नावे

भाजून जखमी झालेल्या कामगारांमध्ये रविंद्र नांदुरकर (वय- ५०), विशाल कांबळे (वय- ४०), राहुल केळकर (वय- ३५) आणि शैलेश मेश्राम (वय- ३५) यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ कोराडी वसाहतीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच महानिर्मितीच्या कोरडी प्रकल्पातील संबंधित विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर संबंधित विभागातील कामकाज काही काळासाठी थांबविण्यात आले होते. दरम्यान, गरम वाफेच्या नळीत गळती कशामुळे झाली याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

वाफेचा वापर कश्यासाठी केला जातो…

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे स्थित कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कोळशावर चालणारा वीज निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) या राज्य शासनाच्या उपक्रमामार्फत चालविला जातो. नागपूर शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रकल्प विदर्भातील वीज निर्मितीचा प्रमुख केंद्र मानला जातो.

येथे कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या साहाय्याने पाणी उकळवून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेच्या दाबाने टर्बाइन फिरवून वीज निर्मिती केली जाते. या प्रकल्पात विविध क्षमतेची अनेक युनिट्स कार्यरत असून एकूण वीज निर्मिती क्षमता दोन हजार मेगावॅटपेक्षा अधिक आहे. औद्योगिक, कृषी तसेच नागरी भागांना सातत्याने वीजपुरवठा करण्यामध्ये या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे.

प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच प्रकल्पातील यंत्रणा सुरक्षित आणि सुरळीत चालाव्यात यासाठी नियमित देखभाल, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा उपाययोजना केल्या जातात.