नागपूर : राज्यभरातील २० पटसंख्येखालील शाळांचे एकत्रिकरण करून समूह शाळा विकसित करण्याचे धोरण शासनाने आखले. त्यानुसार ‘प्रायोगिक तत्त्वावर’ देशभरात ३६ शाळा समूह शाळा म्हणून विकसित करण्यात येणार होत्या. यात महाराष्ट्रातून एकमेव नागपूर जिल्ह्यातील आदर्श शाळा असलेल्या जिल्हा परिषदेच्या पचखेडी शाळेची निवड करण्यात आली. परंतु दोन वर्षांत समूह शाळेच्या संदर्भात कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेल्याचे चित्र आहे.
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने यापूर्वी नोंदवले आहे. राज्यात शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे समूहामध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ होण्यासाठी समूह शाळांच्या निर्मितीचे धोरण शिक्षण विभागाकडून प्रस्तावित होते. त्यानुसार पूर्वी २५० शाळा समूह शाळा म्हणून विकसित होणार होत्या. परंतु याला संघटना व पालकांचा विरोध झाला. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून एक शाळा समूह शाळा म्हणून विकसित करण्याबाबत विचार झाला. मात्र, नंतर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने देशभरातून सर्व राज्यांकडून त्यांच्याकडील प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा समूह शाळा निर्मितीसाठी प्रस्ताव मागवले. त्यानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून ३६ शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे गेले.
केंद्राने त्यापैकी महाराष्ट्रातून एकमेव नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पचखेडीची निवड केली. परंतु दोन वर्षांत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेल्याची चर्चा आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश गुंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
लगतच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन
या शाळेची दुरुस्ती करण्यात आली असून त्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पचखेडीची शाळा समूह शाळा म्हणून विकास करताना लगतच्या दोन, पाच किलोमीटर अंतरातील शाळांतील विद्यार्थ्यांचे या शाळेत समायोजन करण्यात येणार होते. विद्यार्थ्यांच्या ये-जासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार होती. परंतु अद्याप काहीच झाले नाही.
पचखेडी शाळेची स्थिती
२०२३-२४ च्या ‘यू-डायस’नुसार पचखेडी शाळेची पटसंख्या १९७ असून, येथे सात वर्गखोल्या आणि इयत्ता १ ते ८ पर्यंतचे वर्ग असून, आठ शिक्षक कार्यरत आहेत. आता समूह शाळा म्हणून विकसित होताना या शाळेला लगतच्या १-२ किमी परिसरातील कमी पटाच्या जवळपास दहा शाळा जोडण्याचे नियोजन आहे.
