नागपूर : स्मशानभूमीत आदल्या दिवशी अग्नी संस्कार झालेल्या मृताच्या राखेवर पिवळ्या कापडाची बाहुली, घरासमोर कापलेले लिंबू ठेवून अघोरी पुजा करत जाटू टोणा केल्या प्रकरणात कुही पोलिसांनी बुधवारी कथीत मांत्रिक रामनरेश नथ्थू विश्वकर्मा (५८, रा. प्रधानमंत्री आवास योजना, भिलगाव) याला अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
विश्वकर्मा याने कुही तालुक्यातील साळवा येथील स्मशानभुमीत २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ही अघोरी पुजा केली होती. विश्वकर्माने नंतर मृताच्या घरासमोरही कापलेले लिंबू ठेवले होते.
स्मशान भूमीत नेमके काय घडले….?
साळवा येथील रहिवासी प्रशांत बाळू चाचेरकर (३१ ) यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबियांनी स्मशानभूमीत अग्नीदाह संस्कार केले. अंत्यविधीनंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबिय राख सावडण्यासाठी साळवा येथील स्मशानभूमीत गेले असता, तिथे राखेवर पिवळ्या कापडाची बाहुली, लाल-पिवळा धागा, द्रवाने भरलेली बाटली, लिंबू आणि कवळी ठेवलेली आढळली. स्मशानभूमीच्या शोकसभागृहातील बाकड्यावर कपडे, मोजे, बुटांची जोडी, लिंबू व कवळी दिसून आली. त्याच दिवशी सायंकाळी चाचेरकर यांच्या घराच्या चारही बाजूंना कापलेले लिंबू ठेवण्यात आल्याचे आढळले होते.
अघोरी पूजेची पोलिसांत तक्रार….
जादूटोण्याच्या भीतीने धास्तावलेल्या चाचेरकर कुटुंबियांनी त्वरीत कुही पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवत तपास हाती घेतला. या घटनेचे गांभीर्य आणि कुटुंबियांमधील रोष, भिती लक्षात घेऊन कुही पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती काढली. दरम्यान पोलिसांना अघोरी पुजा करणारा मांत्रिक रामनरेश विश्वकर्मा याचा सुगावा लागला. पोलिसांनी त्याला भिलगाव येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता रामनरेशने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने रामनरेशला ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
