डॉ. हरीश धुरट
नागपूर शहराला वैभव होतं म्हणतात. येथे राजा होता, राजधानी होती. सी.पी. ॲन्ड बेरार राज्य असेपर्यंत होती. शहर हिरवाकंच शालू पांघरून होतं. आज एक लाख झाडे लावून ठिगळं लावली जात आहेत. या शहरात सर्व आलबेल होतं का?

सन १७४३ मध्ये भोसलेंनी सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर १ जानेवारी १८७७ या वर्षी एम्प्रेस मिल उभी राहिली. उद्योगाला सुरुवात झाली. १९०६ मध्ये माॅडेल मिल आली. हळूहळू बहुसांस्कृतिक शहर झालं. एम्प्रेस मिलचे खरे नाव ‘सेंट्रल इंडिया स्पिनिंग ॲन्ड वेव्हींग कंपनी लिमिटेड’. राणी व्हिक्टोरियाला ‘एम्प्रेस ॲाफ इंडिया’ हा किताब दिला. त्यावरून त्या सम्राज्ञीच्या नावे एम्प्रेस नाव मिलला दिलं गेलं. या दोन्हीही मिल कामगारांना सकाळी जागे करायच्या. पाच वाजता एक भोंगा व दुसरा साडेपाच वाजता. हळूहळू कामगारांची संख्या वाढली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे, दक्षिणेकडे एम्प्रेस मिल कॉलनी उभी झाली. त्या काॅलनीला लागूनच रेल्वे काॅलनी उभी राहिली. हम्पी यार्ड, लोकोशेड, गँगमन ही इंग्रजी नावे आजही कायम आहेत. येथे काम करणाऱ्यांसाठी दहा बाय दहा चौरस फुटाची खुराडे उभी राहिली. त्याला ‘चाळ ‘असा शब्द प्रचलित झाला. ही माणसं दारिद्र्यात राहावी अशी अवस्था इंग्रजांनी केली होती. ती रीत आजही सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर मिल कामगारांची हरिभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नरेंद्रनगरजवळ एक एम्प्रेस मिल काॅलनी उभी राहिली. आज त्या वसाहतीत कामगार औषधालाही सापडत नाहीत. मॉडेल मिल चाळ शेवटचे आचके देत आहे.

कापूर हवेच्या संपर्कात आला की तो आपोआप उपवतो. शहरातल्या कष्टकऱ्यांच्या वसाहतींचे तसेच झाले आहे. राजे रघुजी नगरमध्ये गोंड मोहल्ला होता. तो संपला. सीताबर्डी टेकडी रोडवर मोलकरिणींची वसाहत होती. तिच्यावर धनाढ्यांची नजर गेली. ती वसाहत वाचावी म्हणून उमेश चौबे यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. ती वसाहतच उपवली. लक्ष्मीनगरजवळ वसंतनगर येथे वसाहत होती. ती वाचवण्यासाठी अनुराधा गांधी, मोहन कोठेकर व अनेकांनी प्रयत्न केले. त्या जागेवर अन्नाभाऊ साठेंचा पुतळा उभा झाला. वसाहत उपवली. रेशीमबागजवळ वसाहत होती. त्यासाठी जयंत लुटे सारख्या अनेकांनी आंदोलने केली. त्या जागेवर एक संस्था उभी राहिली. वसाहत संपली. शहरातल्या कष्टकऱ्यांच्या वसाहती श्रीमंतांच्या, उद्योगपतींच्या. जनसेवा नाव दाखवणाऱ्यांनी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी केली. यासंदर्भात. बा.सी. मर्ढेकर यांनी हातावर पोट भरणाऱ्या माणसांना ‘रुटीनांचे जंतू’ अशी संज्ञा दिली होती.

वानगीदाखल हे प्रसंग दिले. या वसाहती उजाड झाल्यानंतर बायामाणसं जातात कुठे? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. शहर तेच! अक्कू नावाच्या माणसाला भर न्यायालयात लोकांनी मारून टाकले. वरवर तो गुंड होता, उपज कशाची? अमेरिकन शास्त्रज्ञ-तत्त्वज्ञ हेन्री थेरो म्हणतो, ‘उपाशी जनावरे जशी जास्त आक्रमक होतात, क्रूर होतात, तसाच दारिद्र्यात दिवस काढणारा माणूस पाशवी वर्तनास उद्युक्त होऊ लागतो.’

मिलमध्ये काम करणारी माणसं बेरोजगार झाली. नारायण मेघा लोखंडे यांनी १८८४ मध्ये उभा केलेला लढा नागपुरात पोहचलाच नाही. कापडाच्या गिरण्यांमध्ये जात पाहून काम मिळत होतं. लहान मुलांना बारा-बारा तास काम करावं लागत होतं. महिलांना मासिक पाळी येते म्हणून तिला सुट्टी घेता येत नव्हती. साप्ताहिक सुट्टी नव्हती. याविरुद्धचा आवाज नागपूर कापड गिरण्यात आलाच नाही. स्वातंत्र्यानंतर काही कायदे आलेत. पुन्हा कर्मचारी-कामगार-कष्टकरी असे त्रिकूट बघायला मिळाले. नागपूर शहरात औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालये आलीत. कामगार न्यायालयात डझनभर न्यायाधीश आलेत. कामगार खात्यात न्याय मिळत नाही म्हणून कामगारांनी न्यायालयाची वाट धरली. तेथेही निकाल लागतो, पण न्याय मिळत नाही असा कामगारांचा समज झाला. काही दिवसांनी ही न्यायालये बंदी पडली तर वाईट वाटण्यासारखे काहीच राहणार नाही. समाजाचे व्यवस्थापन करण्याची एक विचारसरणी दिसली होती. ‘सिंडीक्युलिझम’ म्हणून मान्यता मिळण्यासाठीचा विचार होता. उद्योग-कारखाने-उत्पादन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगारांची भागीदारी! नागपुरात एका उद्योगात प्रायोगिक तत्त्वावर कामगार प्रतिनिधी घेतला होता. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अंगमेहनत करणारा, हाताला काम मागणारा, कामाचे पूर्ण दाम मागणारा या प्रक्रियेतून बाद झाला.

शहर रंगरूपाने बदलत गेलं. आकाराने फुगत गेलं. महात्मा गांधींच्या अर्थव्यवस्थेत हे शहर कुठे आहे? शहरातला एक वर्ग भौतिक गरजांमध्ये आनंद व्यक्त करतो, एक वर्ग भाकरीसाठी वनवन भटकतो, गिग कामगाराने मरणाचीही भीती सोडली आहे. शहर वाढत गेलं. कष्टकरी कामगारांची आयात झाली. यातून मिनीमातानगर, डिप्टी सिग्नल नगर जन्माला आली. आयात केलेले हे कष्टकरी पुढे शहराचे मतदार झाले. ज्या नेत्याने हा खटाटोप केला त्याच नेत्याची गाडी प्रचारादरम्यान लोकांनी जाळली. ती गाडी एका डॉक्टरची निघाली. आरोप संपला, वाद संपला, नुकसान भरपाईचा प्रश्न संपला. हक्काचा मतदार मिळाला! ते मतदार कोण्या पक्षाचे?

शहरातल्या कापड औद्योगिकरणाने विणकर समाज बाहेर फेकला गेला. कोष्टी म्हणून ओळख असणाऱ्या समाजाला काम, प्रतिष्ठा, पैसा मिळण्यासाठी राम हेडाऊ यांनी प्रयत्न केला. लढले, लढत राहिले. त्या समूहाला हलबा, कोष्टी या वादात गुंतवून ठेवले. आज सावजी म्हणून त्यांची शहरात ओळख झाली. उपयोग काय? त्यांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती नावापुरती शिल्लक आहे. कापड उद्योगाच्या पुरात विणकर समाज कुठे वाहून गेला, ते समजलेच नाही. एकदा कामगार न्यायालयात अनिष्ट प्रथांवर चर्चा सुरू होती. मी एम्प्रेस मिलच्या कामगारांना विचारले, कसे चालू आहे? त्या कामगाराच्या हातात फाटकी कापडी पिशवी होती, तुटलेली चप्पल होती. अशा अवस्थेत तो नेहमीच दिसायचा. तो म्हणाला, ‘तारीख पे तारीख सुरू आहे. या मंदिरात येत जात राहावे.’ त्यात तो पुढे म्हणाला, ‘मरणासाठी जगणे सुरू आहे’. तो हताश नव्हता, निराश नव्हता. ते तत्त्वज्ञान त्याला हलाखीच्या जगण्यातून मिळाले असेल काय?

drdhurat@gmail.com