नागपूर : आदिवासींच्या जमिनींचे दस्त लावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मुखत्यारपत्रधारकाचा मृत्यू झालेला असताना आणि फेरफार पंजीमध्ये भूखंडाचा उल्लेख नसतानाही दुय्यम निबंधकांकडून दस्तांची नोंदणी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

भूखंडावरून वाद निर्माण होण्याची भीती

याबाबत तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर मार्गदर्शनही मागितले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुय्यम निबंधकांकडून नियमबाह्य दस्तांची नोंदणी करण्यात येत असल्याने असून भविष्यात भूखंडावरून वादही निर्माण होण्याची भीती व्यक्ती व्यक्त करण्यात येत आहे.

तपासणीविनाच नोंदणी

सामान्य नागरिक परिश्रम करून पैसे गोळा करतात आणि घर, भूखंड खरेदी करतात. ते करताना नागरिकांची फसवणूक होता कामा नये म्हणून सरकारकडून विविध कायदे केले जाते. परंतु दुय्यम निबंधकांकडून त्याला छेद दिला जात आहे. दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधकांकडून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्याकडून तसे न करता दस्त नोंदणी केली जाते.

एक भूखंड अनेकांना विक्री होण्याची शक्यता

नागपूर ग्रामीण तहसील कार्यालदारांकडून यासंदर्भातीत एक तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यानुसार सातबारावर बँकेचा बोजा नमूद असताना ना हरकत प्रमाणपत्राशिवाय दस्त नोंदणी केली जात आहे. त्याचप्रमाणे झोनचा दाखला न लावता फक्त झोनच्या नकाशाची प्रत जोडण्यात येत आहे. मुखत्यारपत्रधारकाचा मृत्यू झाला असताना दस्त नोंदवण्यात येत आहे. विक्री करणाऱ्या भूखंडाचे प्रत्यक्षात क्षेत्र कमी असते. पूर्वी झालेल्या खरेदी- विक्रीची नोंदच फेरफार पंजीत नमूद करण्यात येत नाही. त्यामुळे एकच भूखंड अनेकांना विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेरफार करणे अवघड

सातबारामध्ये खुला भूखंड, रस्ते, मैदान हे क्षेत्रच निर्धारित करण्यात येत नसतानाही दस्त लावण्यात येत आहे. त्यामुळे तलाठ्यांना फेरफार करणे अवघड होत असल्याची तक्रार तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यावर मार्गदर्शनही मागण्यात आले आहे.