नागपूर : शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्ण जागा होता. तो डॉक्टरांच्या सूचनांना प्रतिसाद देत हाताची हालचालही करीत होता. त्याच वेळी डॉक्टर त्याच्या मेंदूतील गाठ काढत होते. नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ या प्रगत तंत्राने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
मेंदूतील गाठ नेमकी कुठे होती?
रुग्णाच्या मेंदूच्या उजव्या बाजूला ‘मोटर स्ट्रिप’ या अत्यंत महत्त्वाच्या भागात गाठ होती. मेंदूचा हा भाग शरीराच्या विरुद्ध बाजूच्या अवयवांच्या हालचाली नियंत्रित करतो. त्यामुळे गाठ काढताना या भागाला इजा झाल्यास रुग्णाच्या डाव्या हाताच्या हालचालींवर परिणाम होण्याचा धोका होता.
रुग्णाला जागे का ठेवण्यात आले?
मेंदूच्या कार्यक्षम भागाचे संरक्षण करण्यासाठी ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ तंत्राचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये रुग्णाला जागृत ठेवण्यात आले. त्या वेळी तो डॉक्टरांच्या निर्देशांना प्रतिसाद देत होता. यामुळे कोणत्या भागाला स्पर्श झाल्यास हालचालीवर परिणाम होतो, हे डॉक्टरांना त्याच क्षणी समजत होते.
डॉक्टरांनी हालचालींची तपासणी कशी केली?
गाठ काढण्याची प्रक्रिया सुरू असताना रुग्णाच्या डाव्या हाताच्या हालचालींवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. या तात्काळ मज्जासंस्थाविषयक निरीक्षणामुळे हाताच्या हालचालींसाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या भागाचे संरक्षण करीत गाठ सुरक्षितपणे काढणे शक्य झाले.
या तंत्राचा नेमका फायदा काय?
सामान्य शस्त्रक्रियेत रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध असल्याने मेंदूच्या संबंधित कार्याची तत्काळ तपासणी करता येत नाही. मात्र, या पद्धतीत रुग्णाचा प्रतिसाद थेट मिळत असल्याने डॉक्टरांना गाठ काढतानाच हालचाल, बोलणे किंवा अन्य मज्जासंस्थाविषयक कार्य सुरक्षित आहे की नाही, हे तपासता येते. त्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका कमी करण्यास मदत होते.
शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीत काय आढळले?
गाठीच्या ऊतक तपासणीत ती ‘श्रेणी ४ ऑलिगोडेंड्रोग्लिओमा’ असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णाची प्रकृती आणि पुढील वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन कर्करोगावरील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे.
ही शस्त्रक्रिया कोणी केली?
रुग्णालयातील मज्जाशल्यचिकित्सक डॉ. स्वप्नेश चिंधालोरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. संवेदनशील भागातील गाठ काढण्याबरोबरच रुग्णाची मज्जासंस्थाविषयक कार्यक्षमता सुरक्षित राखणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या मेंदूच्या कार्याचे त्वरित मूल्यांकन करून पुढील प्रक्रिया नियंत्रित करता येते. या शस्त्रक्रियेत बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. केतकी मारोळकर, डॉ. अजित ज्योतीपुरकर आणि वैद्यकीय चमू सहभागी झाला. संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिष देशमुख, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी आणि उपअधीक्षक तथा शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. सुश्रुत फुलारे यांनी चमूचे अभिनंदन केले.
