नागपूर : शहरातील गांधीबाग आणि बजाजनगर परिसरातील सराफा व्यापाऱ्यांना प्रत्येकी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झाले आहेत. या घडामोडीत तहसील पोलिसांनी या धमकीच्या प्रकरणात अज्ञात खंडणीखोरोवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच गुन्हे शाखा आणि सायबर सेलकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.
पत्र पोचवणारी ती महिला कोण….?
या प्रकरणी न्यू इतवारी मार्गावरचे दुर्गा ज्वेलर्सचे संचालक नेहाल टिनखेडे (३१) यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टिनखेडे यांच्या दुकानात दुपारी साडेतीनच्या सुमारास एक महिला आली. तिने टपाल तिकिटासाठी १० रुपये मागितले आणि एक पाकिट टिनखेडे यांच्या हातात दिले. त्यानंतर ती निघून गेली. टिनखेडे यांनी ते उघडून पाहिले असता त्यात सात स्वतंत्र पाकिट आणि धमकीची चिठ्ठी होती. सात लिफाफ्यांवर गांधीबाग परिसरातील अन्य सराफा व्यापाऱ्यांची नावे होती. चिठ्ठीत ‘लॉरेन्स बिश्नोईचे शूटर्स मुंबईवाले’ असा उल्लेख होता, असे टिनखेडे यांनी तहसील पोलीसांत केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
धमकीत होता जय श्रीराम फलकाचा उल्लेख….
टिनखेडे यांनी लिफाफा उघडला असता त्यात चिठ्ठीत ‘लॉरेन्स बिश्नोईचे शूटर्स मुंबईवाले’ असा उल्लेख करून तीन दिवसांत १० लाख रुपये रोख रकमेची सोय करण्यास सांगण्यात आले होते. पैसे न दिल्यास गळा चिरून हत्या करण्याची तसेच पोलिसांकडे मदत मागण्याची चूक करू नये, असाही मजकूर लिहिलेला होता. पैसे जमा झाल्यानंतर दुकानासमोर रस्त्यावर ‘जय श्रीराम’चे फलक लावण्याचा संदेशही पत्रात देण्यात आला होता.
दिवाळीच्या तोंडावर सराफांमध्ये दहशत…
बिष्णोई टोळीच्या नावाने रविवारी शहरातील १०हून अधिक सराफा व्यापाऱ्यांना खंडणी मागणारी धमकीची पत्रे पाठवण्यात आली होती. त्यानंतर व्यापारी वर्गात खळबळ उडाल्याने सराफा असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधत सुरक्षेची मागणी केली होती.
