नागपूर : शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक दरम्यान उभारण्यात येत असलेल्या ८.९ किमी लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पुन्हा एकदा रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एप्रिल २०२६ ची मुदत हुकल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नागपूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. भांडे प्लॉट ते दिघोरी हा भाग वेळेत खुला होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात काम अपूर्णच राहिले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रगती न झाल्याने प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दाट वस्तीतून काम; नागरिक त्रस्त

हा उड्डाणपूल जुन्या व दाट लोकवस्तीमधून जात असल्याने बांधकाम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. अनेक इमारतींच्या अगदी जवळून खांब उभारले जात असल्याने स्थानिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर साचलेला मलबा, बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अरुंद रस्त्यांमुळे सतत कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. बाजारपेठेतील गजबजेमुळे गैरसोय अधिक वाढली आहे.

तांत्रिक गुंतागुंत; मोठ्या स्पॅनचे आव्हान

या प्रकल्पात सुमारे ३ किमी लांबीचा भाग यूएचपीएफआरसी गर्डर्सवर उभारला जात आहे. यात ९० मीटरचे दोन, ६० मीटरचे ३६ तसेच ४० ते ४५ मीटरचे अनेक स्पॅन समाविष्ट आहेत. अशा मोठ्या तांत्रिक रचनेमुळे कामाची गुंतागुंत वाढली असून प्रगतीचा वेग मंदावला आहे. पुलाची रुंदी १२ मीटर असून दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्गिका विकसित केल्या जात आहेत.

इतर प्रकल्पांवरही परिणाम

उड्डाणपुलाच्या कामासोबत पाचपावली परिसरातील रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. अग्रसेन चौक येथे मेट्रो मार्गिकेसह दुहेरी स्तरावरील वाहतूक व्यवस्था उभारण्यात आली असून अशोक चौकात उंचावलेली रोटरी विकसित करण्यात आली आहे. तरीही मुख्य उड्डाणपूल रखडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे.

एनएचएआयने संपूर्ण प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी वारंवार होणाऱ्या विलंबामुळे ही मुदतही पाळली जाईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून रुग्णवाहिका, शालेय वाहतूक आणि व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिकांकडून प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असून, कामाला गती देऊन तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.