नागपूर : रात्रीची अपुरी झोप, वाढता ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे जगभरात झोपेच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अमेरिकेत तर सुमारे ३० टक्के लोकांना झोपेचे विविध त्रास असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत नागपूर आता या जागतिक समस्येचे समाधान देणारे केंद्र ठरणार आहे. दिवसाढवळ्या झोप येणाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या या औषधीची निर्मिती नागपुरातील प्लांटमधून होणार असल्याची माहिती आहे.
एफडीएकडून मिळाली मंजुरी
मिहान परिसरातील ल्युपिन लिमिटेडच्या अत्याधुनिक प्रकल्पात विकसित करण्यात आलेल्या झोपेशी संबंधित विकारांवरील औषधाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) तात्पुरती मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूरचा फार्मा क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. हे औषध मुख्यतः ‘नार्कोलेप्सी’ या विकारावर उपयोगी ठरणार आहे. या विकारामुळे रुग्णांना दिवसा अनियंत्रितपणे झोप येते, ज्यामुळे दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी उपचार पर्याय म्हणून हे औषध विकसित करण्यात आले आहे.
मिहानमध्ये होणार उत्पादन
मिहानमधील ल्युपिनचा प्लांट हा देशातील सर्वात आधुनिक फार्मास्युटिकल प्रकल्पांपैकी एक मानला जातो. येथे गोळ्या, कॅप्सूल तसेच इंजेक्शन तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात ‘प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर’ आधारित यंत्रणा वापरली जाते, ज्यामुळे उत्पादन प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि औषधांची गुणवत्ता उच्च दर्जाची राखली जाते. या प्लांटमध्ये सुमारे ७ हजार ८०० पॅलेट्सची साठवण क्षमता असलेली स्वयंचलित वेअरहाऊसिंग आणि डिस्पॅच प्रणालीही उपलब्ध आहे. यामुळे उत्पादन ते वितरण हा संपूर्ण प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित बनतो.
महागड्या औषधांवर स्वस्त पर्याय
नागपुरातून तयार होणारी ही औषधे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया तसेच कॅनडा यांसारख्या जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केली जातात. एफडीएकडून मंजुरी मिळणे म्हणजे या औषधांच्या गुणवत्तेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, हे औषध ‘पिटोलिसंट’ या नावाने ओळखले जाणार असून ते आधीपासून उपलब्ध असलेल्या महागड्या ब्रँडेड औषधांना स्वस्त पर्याय ठरू शकते. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, नागपूर आता केवळ भौगोलिक केंद्र न राहता, आरोग्य क्षेत्रातही जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान निर्माण करत आहे. झोपेच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लाखो लोकांसाठी नागपूरहून येणारी ही ‘गुड न्यूज’ ठरू शकते.
