नागपूर : वाढते वय, नातेवाईकांचे टोमणे आणि आयुष्यात साथीदाराची असलेली आस… या सगळ्या भावना उराशी बाळगून गुजरातमधील भावनगरचा आकाश पारेख या तरुणाने नागपूरची वाट धरली. स्वतःचा संसार थाटण्याचे, नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला मात्र नागपुरात भयानक विश्वासाघाताचा सामना करावा लागेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. लग्नाचे वय उलटून चालल्याने हतबल झालेल्या आकाशला त्याच्या एका परिचित मित्राने नागपुरातील मुलीचे स्थळ सुचवले. लग्नाच्या आशेने भावनगरहून निघालेल्या आकाशच्या मनात नव्या आयुष्याची स्वप्ने फुलत होती. नागपुरात पोहोचल्यावर राणी उर्फ कोमल पांडे या तरुणीने मेयो रुग्णालयाजवळ त्याची भेट ‘नम्रता मालवीय’ नावाच्या मुलीशी घालून दिली.

कुटुंब पाहण्यासाठी आकाशने मुलीच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. टोळीने त्याला कोराडी परिसरातील एका घरात नेऊन ‘मुलगी दाखवण्याचा’ बनाव रचला. इतकेच नव्हे, तर “आजच लग्न उरकून टाकू” असा विश्वास दाखवून त्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले.

आनंदाच्या क्षणीच पाडला दरोडा

लग्नाच्या विधींचा बनाव करत टोळीने त्याच्याकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. लग्नाच्या आनंदाच्या भरात आकाशने क्षणाचाही विचार न करता एटीएममधून ७० हजार रुपयांची रोख रक्कम काढली आणि सोबत आणलेले सोन्या-चांदीचे दागिने नम्रताच्या हाती सोपवले. बर्डी परिसरात लग्नासाठी जात असतानाच अचानक एक भलताच नाट्यमय प्रकार घडला. नम्रताचा कथित पती अचानक रस्त्यात समोर आला आणि “ही माझी पत्नी आहे” असे म्हणत आकाशशी भरचौकात वाद घालू लागला. ज्या मुलीला तो आपली जीवनसंगिनी मानणार होता, ती आणि तिची टोळी आपल्याच भावनांशी खेळून आपल्याला लुटत आहे, हे सत्य जेव्हा आकाशच्या लक्षात आले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काही वेळातच आकाशने स्वतःला सावरले आणि थेट तहसील पोलीस ठाणे गाठून आपबिती मांडली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली आणि मुख्य सूत्रधार नम्रता मालवीय हिला बेड्या ठोकल्या. तिच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाने मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल पांडे हिलाही पंचपावली परिसरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नाची आस असलेल्या निष्पाप तरुणांच्या हतबलतेचा आणि भावनांचा फायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या या ‘लुटेरी दुल्हन’ टोळीने भूतकाळातही अशाच प्रकारे कित्येकांचे संसार उध्वस्त केले आहेत का, याचा पोलीस आता शोध घेत आहेत. या घटनेने मात्र विश्वासावर चालणाऱ्या नात्यांच्या संकल्पनेला हादरवून सोडले आहे.