नागपूर : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिरवा झेंडा दाखवत असतानाच फलाटावर तैनात असलेले तिकीट तपासनीस गगनदीप सिंग अचानक भोवळ येऊन कोसळल्याने काही काळ रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली.

नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर शनिवारी दुपारी ३ वाजता नागपूर ते मडगाव एक्स्प्रेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. मात्र, या सोहळ्यादरम्यान दीर्घकाळ उन्हात तैनात असलेले तिकीट तपासनीस गगनदीप सिंग यांना अचानक भोवळ आली आणि ते फलाटावरच कोसळले. घटनेनंतर काही काळ प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल केले. गगनदीप सिंग यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

नियमित एक्स्प्रेसचा दर्जा

विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडीला अखेर नियमित एक्स्प्रेसच्या दर्जा मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी या गाडीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके आणि नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होते.

१३० टक्के ऑक्युपन्सीमुळे दररोज धावण्याची शक्यता

लोकार्पण सोहळ्यात बोलताना गडकरी म्हणाले, सध्या आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. गाडीची ऑक्युपन्सी तब्बल १३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. भविष्यातही प्रवाशांचा असाच प्रतिसाद कायम राहिल्यास ही गाडी दररोज सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासन निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ शकते.

प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश

गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर-मडगाव विशेष गाडीला कायमस्वरूपी दर्जा देण्याची मागणी विदर्भ आणि कोकणातील प्रवाशांकडून केली जात होती. रेल्वे बोर्डाने या मागणीची दखल घेत ०११३९/०११४० या विशेष गाडीचे नियमितीकरण केले आहे. आता ही गाडी ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या क्रमांकाने धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक नियोजित आणि स्थिर सेवा उपलब्ध होणार आहे.

नवीन वेळापत्रकासह ‘रोहा’ला अतिरिक्त थांबा

नवीन वेळापत्रकानुसार, ही गाडी नागपूरहून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता सुटेल. मडगावहून ती गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ८ वाजता प्रस्थान करेल. परतीच्या प्रवासात नागपूरला सोमवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘रोहा’ स्थानकावर दोन्ही दिशांनी अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. तसेच वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी यांसह २४ प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.