नागपूर : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर कार्यालयातच झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात पुन्हा दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. थकीत वीजबिल वसुलीस गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शिवीगाळ करून तोडफोडीची धमकी देण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत वरिष्ठ यंत्रचालकाला जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत मानकापूर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजबिल वसुलीस गेलेल्या कर्मचाऱ्यासोबत नेमके काय घडले?

मानकापूर उपकेंद्रातील वरिष्ठ तंत्रज्ञ १० जुलै रोजी गोधनी येथील एस.डी.पी.एल. अपार्टमेंटमध्ये थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. येथील रहिवासी दर्शन महादेव साखरे (५०) यांच्याकडे ४३ दिवसांपासून ३ हजार ४३२ रुपये ८७ पैसे इतके वीजबिल थकीत होते. कर्मचाऱ्यांनी बिल भरण्याची विनंती करताच साखरे यांनी तू कोण आहेस? असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. तेथील सुरक्षा रक्षकांनीही महावितरण कर्मचाऱ्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. तसेच महावितरणच्या कार्यालयात येऊन तोडफोड करण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत कोणाला धमकी देण्यात आली?

जुना काटोल नाका येथील महावितरण उपकेंद्रात कार्यरत वरिष्ठ यंत्रचालक बंटी अशोक बहने (४२), रा. लष्करी बाग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ११ जुलै रोजी घडली. येथे मंदाकिनी डेंबरे यांनी नवीन वीजजोडणीसाठी पैसे भरले होते. मात्र संबंधित एजंटने त्यांच्याकडून १ हजार ९०० रुपये अधिक घेतल्याची तक्रार होती. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा सल्ला बहने यांनी ग्राहकाला दिला होता. याचाच राग मनात धरून जानराव मेंन्डोले (५०), रा. गोरेवाडा यांनी बहने यांना तू ग्राहकाला माझ्याबद्दल उलटसुलट का सांगतो? असे म्हणत बाहेर येण्याचे आव्हान दिले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी कोणती कारवाई केली?

मानकापूर प्रकरणात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. तर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जानराव मेंन्डोले यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर कार्यालयात हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत महावितरणच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या आणि कामात अडथळ्याचा सामना करावा लागल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.