नागपूर : महावितरणकडून राज्यभरातील ग्राहकांकडे सक्तीने टाइम ऑफ डे मीटरच्या (टीओडी मीटर) नावावर ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावले जात आहेत. देयकात स्मार्ट मीटर क्रमांकही दर्शवला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मीटर जुनेच आहे. या ग्राहकांना सरासरी देयक जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातही याबाबत अनेक तक्रारी आहेत. ४१००१७७७७८९४, ४१००२३३९९६७२, ४१००१३२१८८०७ या ग्राहक क्रमांकांच्याही तक्रारी आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी वीज अधिकारी, कर्मचारी संघटना, ग्राहक संघटनांकडून स्मार्ट मीटरला कडाडून विरोध झाला होता.
त्यानंतर तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर सामान्य ग्राहकांकडे लागणार नसल्याची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर मात्र या मीटरचे नाव टीओडी मीटर करून ते सक्तीने लावले जात आहेत. याबाबत महावितरणकडून अधिकृत लेखी आदेश काढले जात नाही. तोंडी आदेशाद्वारेच सर्व काम सुरू आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे म्हणणे काय?
स्मार्ट मीटरला सगळ्यांचा विरोध असतानाही ते नियमबाह्यपणे लावले जात आहेत. अनेक ग्राहकांकडे मीटर लागले नसतानाही ते देयकात दर्शवून जास्त शुल्क आकारले जात आहे. हा प्रकार खपवून घेऊ नये. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे मीटर लावणार नसल्याचे आश्वासन दिले होते. आता मीटर ग्राहकांवर लादले जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.
महावितरणचे म्हणणे काय?
महावितरणच्या मुख्यालयात सध्या याबाबत तक्रारी नाहीत. परंतु, तक्रार आलीच तर तातडीने दुरुस्ती केली जाईल. ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून महावितरणकडून काळजी घेतली जाईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
स्मार्ट प्रीपेड मीटर काय आहे ?
सध्या महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर लागले आहे. या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली त्याचे नियमित वाचन दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम वा कंत्राटी कर्मचारी करतात. त्या आधारावर ग्राहकाला देयक पाठवले जाते. स्मार्ट प्रीपेड मीटर ‘मोबाइल’ रिचार्जप्रमाणे काम करणार आहे. जितके पैसे भरले तितकीच वीज ग्राहकांना वापरता येईल. या मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला क्षणात त्याच्या भ्रमणध्वनीवर ॲपच्या माध्यमातून बघता येईल. सध्या महावितरण प्रीपेडच्या ऐवजी पोस्टपेड म्हणजे पूर्वीप्रमाणे देयक ग्राहकांना देणार आहे. परंतु या मीटरमध्ये कधीही प्रीपेडमध्ये परावर्तित करण्याची सोय आहे.